लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीला शाहू महाराज यांना माझ्या विरोधात उभे करणे हे शरद पवार यांचे षडयंत्र आहे, असा आरोप शिंदे सेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.
ते म्हणाले, शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. मी त्यांना मानतो. परंतु शाहू महाराज यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा कधी व्यक्त केलेली नव्हती. पण आता ते उभे राहत आहेत. यामागे शरद पवार यांचेच षडयंत्र आहे. कदाचित त्यांना मंडलिक कुटुंबावरील जुना राग काढायचा असावा.
आणखी वाचा- उद्धव ठाकरे-राजू शेट्टी यांची मातोश्रीवर भेट; लोकसभा उमेदवारी बाबत चर्चा
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून समरजित घाटगे यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याकडे लक्ष वेधले असता मंडलिक म्हणाले, त्यांनी कधी लोकसभा निवडणूक लढवणार असे विधान केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्यात रस दिसतो.
सतेज पाटील यांनी मंडलिक यांची उमेदवारी बाबत भाष्य करताना अद्याप उमेदवारी बाबत निश्चित काही घडलेले नाही. राजकारणाचे फासे पलटतील. आणि काही लोक आमच्या सोबत प्रचारात दिसतील, असे विधान केले होते. त्यावर बोलताना मंडलिक म्हणाले, सतेज पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. तेच माझ्या स्टेजवर आलेले दिसतील, असा प्रतिटोला लगावला.