मेळावा विक्रमी होणार —चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या प्रचाराचा प्रारंभ येत्या २४ मार्च रोजी कोल्हापुरातील मेळाव्यातून होणार आहे. या मेळाव्याची सभा ही विक्रमी उपस्थितीची राहील आणि त्यातून युतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात वातावरण निर्मिती केली जाणार असल्याचा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. महाराष्ट्रात यूतीला लोकसभेमध्ये ४५ जागा मिळतील, असा अंदाजही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

कागल येथे संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आयोजित शिवसेना भाजप कार्यकर्त्यांंच्या मेळाव्यामध्ये पाटील बोलत होते.

सध्या भाजपात अन्य पक्षातील मोठ मोठे नेते येत असल्याचा धागा पकडत पाटील म्हणाले, की  पुढचा ‘बॉम्ब’ खूपच मोठा आहे.

हे सगळे बॉम्बे फोडून झाल्यावर मी मतदारसंघात बसून राहणार आहे.  प्रियांका गांधी काँग्रेसच्या सभेत येणार हे कांही नवीन नाही. आजचा समाज  सेलिब्रिटीना मत द्यायला नाही तर बघायला येतो. अन्यथा देशाच्या पंतप्रधान हेमामालिनी झाल्या असत्या, असेही पाटील या वेळी म्हणाले.

संजय मंडलिक म्हणाले,की जनतेनेच ही निवडणूक  हातात घेतली आहे. या वेळी सेनेचे सहा आमदार, भाजपचे दोन आमदार आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा यांचे पाठबळ असल्यामुळे ही निवडणूक जिंकणे फार सोपे झाले आहे.

म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, की आता भावनिक आवाहन करण्यापेक्षा वैयक्तिक मतदारांना संपर्क साधून संजय मंडलिकांना विक्रमी मताधिक्य मिळवून देऊ या.

माजी आमदार संजयबाबा घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे अध्यक्ष  महेश जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार , मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार,  जिल्हा परिषद शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांची भाषणे झाली.