कोल्हापूर : सतेज पाटील हा माणसे खाणारा माणूस आहे. शिवसेनेने त्यांच्यापासून सावध राहावे, असे टीकास्त्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सोडले. कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आमदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चंद्रकांतदादा म्हणाले, काँग्रेसची ५० वर्षे आणि भाजपची ५ वर्षे या मुद्दय़ावर ही निवडणूक लढवणार आहोत. कोल्हापूरला विकासापासून काँग्रेसने वंचित ठेवले. तर पाच वर्षांत भाजपने जिल्ह्याचा सर्वागीण विकास केला. यामुळेच आज उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रचंड संख्येने मतदार जमले असून हे सत्यजित कदम यांच्या विजयाचे चिन्ह आहे.
कोल्हापूर जिल्हा सुरक्षित नसल्याने पुण्याला जाऊन चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली. कोल्हापुरातील एखादी जागा रिकामी झाली तर तेथून निवडणूक लढविली जाईल अन्यथा हिमालयात जाईन, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या टिकेकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, जिल्ह्यातील कोणी आमदारांनी राजीनामा दिला तर निवडणूक लढवतो असे आपण म्हटले होते. त्याचा विपर्यास केला जात आहे. याउलट पालकमंत्री सतेज पाटील यांनी काळम्मावाडी नळ पाणी योजनेचे पाणी आणले नाही तर निवडणूक लढवणार नाही असे म्हटले होते. दिवाळीला पाणी आणूच अशी घोषणा केली होती. आतापर्यंत चार दिवाळी गेली; पण पाणी अजून आलेले नाही. हसन मुश्रीफ यांचीही नव्या नळपाणी योजनेच्या पाण्याने दिवाळीत आंघोळ घालण्याची घोषणा हवेत विरली आहे.
पोटनिवडणुकीसाठी शिवसेना इच्छुक होती. पण काँग्रेसच्या जागा सोडण्यात आल्याने नाराज शिवसैनिक संपर्कात आहे का? या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले, ते सांगण्याइतका मी कच्चा राजकारणी नाही. कोल्हापुरात सातपैकी पाच वेळा शिवसेनेचा विजय झाला आहे. मतदारसंघ न मिळाल्याने शिवसैनिक नाराज, हतबल आहेत. नबाब मलिक यांच्यासाठी मोर्चा काढावा लागत असल्याने ते अस्वस्थ आहेत. काँग्रेस आपल्या बोकांडीवर बसेल या भीतीतून शिवसैनिक वचपा काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.