कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याची घोषणा झाल्यावर कोल्हापूर शहरात तसेच संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांंनी बुधवारी जोरदार आनंद व्यक्त केला. साखर- पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात नेहमीच आनंदाची उधळण होताना दिसते. तीन दिवसांपूर्वी याच ठिकाणी भाजपने आपली सत्ता आल्याबद्दल आनंदोत्सव साजरी केला होता. पण भाजपची सत्ता जाऊ न महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा शपथविधी मुंबईत शिवतीर्थावर होणार असताना इकडे कोल्हापुरात तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांंच्या आनंदाला उधाण आले होते. तिन्ही पक्षांचे पदधिकारी, कार्यकर्ते जल्लोष करण्यासाठी एकत्र आले. त्यांनी महाविकास आघाडीच्या नावाने जयघोष केला. तिन्ही पक्षाचे झेंडे फडकत होते. ढोलताशाच्या गजरात फटाक्याची आतषबाजी करीत जिलेबी, साखर -पेढे, वाटण्यात आले.
या आनंदोत्सवात राष्ट्रवादीच्या महापौर सूरमंजिरी लाटकर, शहर प्रमुख आर. के. पोवार, काँग्रेसचे उपमहापौर संजय मोहिते, शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण स्थायी समिती शारंगधर देशमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार आदींसह कार्यकर्ते, महिला, युवक सहभागी झाले होते. एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांचे आजचे वर्तन सुखद धक्का देणारे होते. आज ते एकमेकांना मिठाई भरवत होते.
शिवसेनेचे महालक्ष्मीला साकडे
या कार्यक्रमानंतर शिवसैनिक वाजत गाजत करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात गेले. बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हाती घेतलेले शिवसैनिक त्यांच्या नावाचा जयजयकार करीत होते. ‘उद्धव ठाकरे यांचे सरकार यशस्वी ठरू दे’, असे साकडे देवीला घालण्यात आले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, युवा सेना अधिकारी हर्षल सुर्वे आदींनी देवीला साडीचोळीचा खण, पेढे अर्पण केले. बाळासाहेब व त्यानंतर उद्धव ठाकरे हे कोणत्याही कामाचा शुभारंभ कोल्हापुरातून करताना देवीचा आशीर्वाद घेत. त्यामुळे देवीची पूजा केल्याचे या वेळी सांगण्यात आले.
