पश्चिम महाराष्ट्रातील नवी राजकीय मिसळ

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढल्यानंतर पंचायत समिती सभापती निवडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात नवी राजकीय मिसळ आकाराला आली आहे. वेगाने घोडदौड करणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कधी नव्हे ते काँगेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रित आले. तर काही ठिकाणी भाजप-राष्ट्रवादीने गळय़ात गळा घालत सत्ता मिळवली. या नव्या समीकरणाने अनेक पंचायत समितीत सत्ता मिळवली. दोन्ही काँग्रेसच्या तिरंग्यात शिवसेनेचा भगवा सत्ताकारणासाठी बेमालूमपणे मिसळला. इतक्यावर न थांबता आता या नव्या त्रयीने जिल्हा परिषद काबीज करण्याचा चंग बांधला आहे.

स्थानिक पातळीवर राजकीय मोट बांधण्याच्या स्वातंत्र्याखाली एकत्रित आलेली ही त्रयी मुसंडी मारण्याच्या बेतात असल्याने भाजपनेही आता स्वबळावर गोळाबेरीज करून सत्ताप्राप्तीसाठी हालचाली आरंभल्या आहेत. या नव्या राजकीय सामन्यात कोण कोणावर मात देणार, याचा फैसला २१ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी दिसून येणार आहे.

कोल्हापूरच्या राजकारणाचा चेहरा पुरोगामी. पण सत्तेसाठी हे पुरोगामीपण गळून पडले. निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी कोणाशीही हातमिळवणी न करता स्वबळावर निवडणूक लढवण्याचे शिवधनुष्य उचलले. निवडणुकीनंतर हा बाणा उतरणीला लागला. कारण या वेळी शिवसेनेला सत्तेचा डोळा निशाण करायचा होता. त्यातून शिवसेनेने कागल, शाहूवाडी व शिरोळ या तालुक्यात दोन्ही काँग्रेसशी घरोबा करून सभापतिपद  मिळवले. तर याच्या उलटे गडिहग्लज भाजप-राष्ट्रवादी ही दोन टोके एकत्र गुंफली गेली. हातकणंगले पंचायत समिती सभापतिपदी  निवडीसाठी शिवसेना, आवाडे गट व स्वाभिमानी एकत्र आले तरीही भाजपने सभापतिपद मिळवले. विशेष म्हणजे येथे काँग्रेसचा सभापती होणार असताना काँग्रेसच्या दुसऱ्या गटाने खो घालत काँग्रेसच काँग्रेसचा कसा घात करते याचा नव्याने धडा दिला. एका अर्थाने ही काँग्रेसची भाजपला अंतर्गत साथ होती. शिरोळच्या बालेकिल्ल्यात दहा वर्षांची स्वाभिमानाची सत्ता नव्या त्रयीच्या राजकारणामुळे अस्तंगत पावली, पण काँग्रेसच्या सहकार्यामुळे चंदगडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सभापतिपदाची मानकरी बनली.

सत्ताबाजारासाठी राजकारणाचे नवे रंग-ढंग पुरोगामी चेहऱ्याच्या कोल्हापूरने पाहिले. जिल्ह्णाातील पंचायत समितीच्या निवडीमध्ये झालेल्या तडजोडी राजकारणाला कलाटणी देणाऱ्या आहेत. केंद्र व राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेनेने काही पंचायत समितीमध्ये भाजप विरोधात उघड भूमिका घेऊन सत्तेचा वारू रोखण्याचा प्रयत्न केला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची नवी आघाडी उदयाला आली असून, ती जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी सक्रिय होताना दिसत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपसाठी धोक्याची घंटा ठरणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेनेशिवाय सत्ता मिळवण्याच्या हालचाली भाजपने चालवल्या आहेत.

सोलापूर जिल्हय़ांतही करमाळा तालुक्यात शिवसेनेला काँग्रेसने हात दिल्याने दोघांची सत्ता आली. तर याच्यापेक्षा वेगळे समीकरण उत्तर सोलापुरात दिसले. येथे राष्ट्रवादीचे काटे भाजपच्या  दिशेने पडल्याने कमळ उगवले. बार्शीत भाजपने बहुमत मिळवले, पण सभापती आरक्षणाचा  उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीचे फावले. आता जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व शेकापने मोट बांधली असून शिवसेनेला राखीव ठेवले आहे. तरीही भाजपाकडून ऐन वेळी धक्का देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सोलापुरातही कोणता पक्ष कोणाला साथ देईल याची खात्री नसल्याने येथेही राजकारणाचे नवे रंग उधळले जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सातारा जिल्ह्णात घडय़ाळाचे काटे सत्तेच्या दिशेने जात असताना सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेच्या व रयत आघाडीच्या मदतीची गरज आहे. हे नवे समीकरण आकाराला येण्यापूर्वी भाजपने हे सारे मोडून काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला ‘मिनी मंत्रालया’चे सत्तेचे दरवाजे बंद करण्याचा चंग काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या नव्या  राजकीय समीकरणातून दिसत असला तरी सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास भाजप सहजी सोडणार नसल्याने नवा राजकीय सामना रंगतदार होणार हे मात्र नक्की!