कर्नाटकच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर आता दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनीही त्याचीच री ओढली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री गोविंद काजरेळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचे आहेत. ते कन्नड भूमीतील आहेत, असे बेताल विधान करतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. त्यांच्या या विधानावर सीमाभागातील मराठी भाषकातून टीका होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवडय़ात ‘सीमाभाग महाराष्ट्रात आणणारच’ असा निर्धार एका पुस्तक प्रकाशन समारंभात केला होता. त्यावर लगेचच कर्नाटकचे परिवहन मंत्री तथा उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी ‘मुंबई हा कर्नाटकचा भाग आहे’ अशी मुक्ताफळे उधळली होती. त्यावर टीका होत असतानाच आता दुसरे उपमुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री गोविंद काजरेळ यांनी माध्यमांशी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इतिहास माहिती नाही. त्यांनी तो वाचला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज कर्नाटकातील होते. पूर्व कर्नाटकातील गदग जिल्ह्य़ातील सोरटूर हे त्यांचे गाव होते. कर्नाटकात दुष्काळ पडल्यानंतर त्यांचे पूर्वज महाराष्ट्रात गेले होते,’ असा जावईशोध त्यांनी लावला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर त्यांनी असेच बेताल विधान केले आहे. ‘उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. महाराष्ट्रात काँग्रेस अस्वस्थ आहे. शिवसेनेचा पाठिंबा काँग्रेस कधीही काढून घेऊ शकते. त्यामुळे शिवसेनेला काँग्रेसला पाठिंबा काढून घेण्याची भीती वाटते. त्यामुळे ठाकरे विचलित करणारे विधान करत असतात,’ असा दावा काजरेळ यांनी केला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivaji maharaj of karnataka kajrel deputy chief minister of karnataka abn
First published on: 01-02-2021 at 00:10 IST