कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार दौरा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठोकलेला मुक्काम यामुळे कोल्हापुरातील महायुतीच्या प्रचाराला बळ मिळाले आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी गावपातळीपर्यंत संपर्क साधण्यावर भर दिला आहे. मुख्यमंत्री स्वत: दोन्ही मतदारसंघांमध्ये अथक प्रयत्न करीत आहेत.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ साली येथे आले होते. दहा वर्षानंतर पुन्हा त्यांची सभा होत असताना महायुतीने जोरदार तयारी केली होती. सभेत बोलत असताना मोदी यांनी स्थानिक संदर्भ देत मने जिंकली. शेजारच्या कर्नाटकातील दोन निर्णयांचा उल्लेख केला. त्याचे विश्लेषण करीत त्याद्वारे हिंदू मतपेढी भक्कम करण्यावर जोर दिला.
हेही वाचा : काँग्रेसविरोधात भाजपाचा खोटा प्रचार केवळ भीतीपोटी; सचिन पायलट यांचा हल्लाबोल
कर्नाटकामध्ये इतर मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण होते. त्यामध्ये मुस्लिमांचा समावेश केला आणि त्यांनी ते बळकावले. काँग्रेस सत्तेवर आले तर देशातील आरक्षणाला धोका निर्माण होणार असल्याची जाणीव मोदी यांनी करून दिली. कर्नाटकात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अडीच वर्षासाठी नेमले आहेत. झारखंड, राजस्थानमध्ये असाच प्रयत्न झाला होता. काँग्रेस देशात सत्तेवर आलीच तर पाच वर्षासाठी पाच पंतप्रधान देतील. असे अस्थिर सरकार परवडणारे नाही, हेही त्यांनी बजावून सांगितले. मताच्या तुष्टीकरणासाठी दलितांचे आरक्षण आणि सामान्यांची संपत्ती हिरावून घेण्याच्या इंडिया आघाडीच्या प्रवृत्तीवर मोदी यांनी कोरडे ओढले. त्यांच्या या मांडणीला सभास्थळी प्रतिसाद मिळत राहिला. या वातावरण निर्मितीचा महायुती पुढील काळात कसा लाभ घेणार यावर संजय मंडलिक – धैर्यशील माने यांचे भवित्तव्य बरेचसे अवलंबून राहणार आहे.
मोदींच्या वक्त्यव्याची दखल विरोधकांनी तातडीने घेणे भाग पडले आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी दिल्लीहून कोणी येऊन मतदारांना काही सांगायचा प्रयत्न केला तर त्याचा स्थानिकांवर परिणाम होत नाही. कोल्हापूरकरांचा पॅटर्नच वेगळा आहे. इथल्या मातीची अस्मिता, स्वाभिमान शाहू महाराज असल्याने त्यांना दिल्लीला पाठवण्याची जबाबदारी कोल्हापूरकरांनी घेतली आहे, असा उल्लेख करत मोदी यांच्या भाषणाचा निवडणूक निकाल बदलण्यावर परिणाम होणार नाही, असे दाखवून दिले. खासदार संजय राऊत यांनी शिवरायांचे वंशज, शाहू महाराजांविरोधात मोदी प्रचाराला येत आहेत. हे राज्यातील जनता कधीच विसरणार नाही, असा हल्लाबोल केला आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे युवा नेते , दिवंगत आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी शाहू छत्रपतींच्या गादीला विरोध करण्यासाठी स्वतः पंतप्रधानांना कोल्हापूरला यावे लागत असेल लागते हा इथल्या गादीचा अभिमान आहे. मोदींनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण करून तरुणांची डोकी कशी भडकलेली राहतील याची दक्षता घेतली आहे, अशी टीका केली आहे.
हेही वाचा : उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी आणि योगींच्याच विरोधकांपेक्षा अधिक सभा!
मुख्यमंत्र्यांच्या जोडण्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक भलतीच गांभीर्यांनी घेतली आहे. निवडणुकी आधी भाजपने दोन्ही जागा धोक्यात असल्याचे सर्व्हेचे आकडे सांगितले होते. त्याची दखल घेऊन शिंदे यांनी उणिवांची भरपाई करून बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी दोन दिवस ते कोल्हापुरात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्तानेही त्यांचा कोल्हापूरचा मुक्काम वाढला होता. या काळात त्यांनी सक्रिय नसणाऱ्यांना प्रचाराला गती देण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी लावलेल्या जोडण्या वातावरण निर्मितीला पोषक ठरणार आहेत. नाराज अपक्ष आमदार, प्रमुख नेते यांच्या गाठीभेटी घेतल्याचा होत्या. त्याचप्रमाणे ताज्या दौऱ्यातून त्यांनी आणखी जोडण्या लावल्याने प्रचारासाठी फायदा होऊ शकतो.