करवीरनिवासिनी महालक्ष्मीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मार्चपूर्वी मंजूर करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करवीरनगरीत केल्यानंतर राज्य शासनाने या कामाला लगोलग गती देण्याचे ठरवले असून, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा दोन टप्प्यांत करण्याची सूचना केली आहे. पुणे विभागाकडील जिल्हानिहाय वार्षकि योजनांचा आराखडा सन २०१६-१७च्या बठकीत ते बोलत होते.
या वेळी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, वित्त विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, आमदार उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, ‘कोल्हापूरने केलेल्या अतिरिक्त ९३ कोटी ६० लाखांच्या मागणीबाबत आवश्यक ती तपासणी करून निर्णय घेण्यात येईल. अंबाबाई देवस्थानामुळे कोल्हापूरला विशेष महत्त्व असून कोल्हापूर जिल्हय़ाने केलेला अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा पुनश्च दोन टप्प्यांत करण्यात यावा. त्यामध्ये धर्मशाळा, मंदिर परिसराचा पादचारी मार्ग विकास, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणांचा विकास, निर्माल्यापासून खतनिर्मिर्तीसाठी संयंत्र बसविणे, पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर आदी बाबींचा विचार करावा.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी कोल्हापूरच्या जिल्हा वार्षकि योजना २०१६-१७चे सादरीकरण केले. जिल्हा वार्षकि योजना २१६ कोटी १९ लाख रुपयांची आहे. अनुसूचित जाती उपाययोजना १०० कोटी ८१ लाख व आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपाययोजनेसाठी एक कोटी ८० लाख ६८ हजार रुपयांची मागणी आहे. कोल्हापूर जिल्हय़ाची एकूण वार्षकि योजना ३१८ कोटी ८० लाख रुपयांची आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षकि योजनेत ९३ कोटी ६० लाखांची अतिरिक्त मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी आमदार उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके यांनीही विविध सूचना केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speed to work of mahalaxmi pilgrim development plan
First published on: 11-02-2016 at 03:30 IST