scorecardresearch

राज्यात ऊस तोडणीचे आव्हान;  पन्नास लाख टन शिल्लक; पश्चिम महाराष्ट्रातून तोडणी यंत्रे राज्यभरात

गाळप हंगाम सुरू होताना महापुराच्या छायेमुळे गाळप घटण्याची भीती व्यक्त केली जात होती

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : राज्यातील ऊस हंगाम समाप्तीच्या टप्प्यावर असला तरी मराठवाडा, नगर, सोलापूर भागांतील ऊस तोडणीचे आव्हान उभे आहे. अजूनही सुमारे ५० लाख टन ऊस गाळप करण्याचे आव्हान असून ऊसतोड मजुरांच्या मर्यादा जाणवत आहेत. ऊस तोडणीकरिता राज्यभरातून ऊस तोडणी यंत्र पाठवण्याची प्रक्रिया साखर आयुक्तालय, राज्य साखर संघाच्या पातळीवर गतिमान आहे. यासाठी पश्चिम महाराष्ट्राने मदतीचा हात पुढे करीत ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) या भागात पाठवली आहे. मात्र ऊस तोडणी चालकांच्या दृष्टीने हे आर्थिक समीकरण तोटय़ाचे असल्याचे असल्याने हा महत्त्वाचा अडथळा आहे.

राज्यात या वर्षी ऊस गाळप हंगाम सुरू होताना महापुराच्या छायेमुळे गाळप घटण्याची भीती व्यक्त केली जात होती. राज्य शासनाच्या सूचनेनुसार कारखान्यांनी पूरबुडीत उसाचे गाळप करण्याकडे लक्ष पुरवल्याने आणि सतत पाऊस कोसळत राहिल्याने गाळपात अडचणी आल्या. उतारा प्रमाणही घटले. पुढे सारे काही सुरळीत झाले. उलट उसाचे विक्रमी उत्पादन झाले असल्याचे निदर्शनास येऊन नवी अडचण निर्माण झाली.

मराठवाडय़ात ऊस शिल्लक

पुणे, कोल्हापूर या केंद्रातील साखर कारखान्यांचा हंगाम समाप्त झाला आहे. आता आव्हान आहे ते ऊस विपुल प्रमाणात शिल्लक असलेल्या भागातील तोडणीचे. राज्यात सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांसह प्रामुख्याने मराठवाडय़ात ऊस मोठय़ा प्रमाणात शिल्लक असल्याचे संघाकडून सांगितले जाते. ऊस सत्वर तोडला जावा यासाठी शासकीय आणि सहकार पातळीवरील यंत्रणा जोमाने कार्यरत झाली आहे. आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांच्यासह राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कार्यकारी संचालक संजय खताळ यांनी कोल्हापूर जिल्हा बँक, जवाहर साखर कारखाना, सांगलीतील राजारामबापू साखर कारखाना येथे साखर कारखानदारांची बैठक घेऊन ऊस तोडणी यंत्र पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्याला पश्चिम महाराष्ट्रातून  प्रतिसाद मिळत आहे. मराठवाडय़ात दुष्काळ असताना याच भागातून रेल्वेतून पाणीपुरवठा केला होता. आता त्या भागात ऊस पीक तरारून आले असताना त्याच्या तोडणीचा प्रश्न उद्भवला असतानाही याच भागाने मदतीची तत्परता दाखवली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतून अधिकाधिक ऊस तोडणी यंत्र अधिकाधिक पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे साखर सहसंचालक एस. एन. जाधव यांनी सांगितले. जवाहर, दत्त या कारखान्यांनी आणखी यंत्र पाठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शेती अधिकारी अनुक्रमे किरण कांबळे, श्रीशैल हेगांना यांनी सांगितले. ‘ राज्यभरातून १५२ ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) उपलब्ध होतील असा अंदाज आहे. यापैकी काही यंत्रणा ऊस तोडणीच्या कामांमध्ये गुंतलेली आहे. अवकाळी पाऊस,तप्त उन्ह यामुळे ऊस तोडणी यंत्र खराब होण्याचे प्रकार या अडचणी असल्या तरी मे अखेपर्यंत संपूर्ण ऊस गाळप होईल असा प्रयत्न आहे,’ असे संजय खताळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

ऊस तोडणी चालकांच्या अडचणी

साखर कारखान्यांनी ऊस तोडणी तंत्र चालकांना मराठवाडा भागात जाण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून अडचणी विशद केल्या जात आहेत. हंगाम संपल्यानंतर एका यंत्रासाठी लागणारे सरासरी ८ कर्मचारी अन्य कामाच्या ठिकाणी गेले आहेत. काही यंत्रे देखभाल दुरुस्तीसाठी खोलली आहेत. मराठवाडय़ामध्ये ऊस तोडणीसाठी प्रति टन अडीच हजार रुपये आणि प्रवासाची व्यवस्था केली असून हा दर परवडत नाही. तथापि पश्चिम महाराष्ट्रात एकरी साठ-सत्तर टन ऊस निघतो याचे प्रमाण मराठवाडय़ात २०-३० टन असते. दररोज किमान १०० टन तोडणी फायदेशीर असते. हे इतक्या दूरवर जाऊन पुरेसा ऊस तोडला नाही तर गणित तोटय़ाचे होते, असे ऊस तोडणी यंत्राचे चालक सांगतात. उस शिल्लक राहिला तर शेतकऱ्यांना अनुदान द्यावे लागेल. त्यापेक्षा ऊस तोडणीसाठी अधिक रक्कम द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

अजूनही धुराडी पेटतीच

पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक कारखान्यांनी विक्रमी उसाचे गाळप केल्याची नोंद केली आहे. साखर उतारा चांगला आहे.  एकंदरीत राज्यात १९९ कारखाने सुरू राहिले. त्यातील ६० बंद झाले आहेत. १२४७ लाख टन उस गाळप होऊन १३०२ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षी १९० कारखाने सुरू राहिले.१००६ लाख टन उसाचे गाळप होऊन १०५५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sugarcane in marathwada ahmednagar solapur areas still to be cut zws