राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे कोल्हापुरात शिवसैनिकांनी दहन केले. राणे यांच्या विरोधात जोरदार भाषेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी अशा प्रकारचे आंदोलन सुरू केल्याने पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आज संताप दिसून आला. त्याच्या संतप्त प्रतिक्रिया विविध ठिकाणी उमटल्या. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कोल्हापुरात राण यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. राणे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

तर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बिंदू चौकामध्ये आंदोलन केले. युवा सेनेच्या वतीने तावडे हॉटेल या कोल्हापूरचे प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी आंदोलन केले. इचलकरंजी मध्ये उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, शहराध्यक्ष सयाजी चव्हाण यांनी राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो काढून घेण्याचा प्रयत्न झाल्याने झटापट झाली. तर दुपारी तीन वाजता जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव हे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किनी टोलनाका येथे आंदोलन करणार आहेत.