करवीरनगरीचा महापौर निवडीच्या राजकारणाला मंगळवारी आणखी कलाटणी मिळाली. काँग्रेस पक्षाने अश्विनी रामाणे यांना उमेदवारी दिली असून, भाजपने सविता भालकर, तर ताराराणी आघाडीने स्मिता माने यांचा अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर निवडीसाठी राष्ट्रवादीकडून शमा मुल्ला यांचा आणि भाजपने राजसिंह शेळके, ताराराणी आघाडीने ललिता बारामते यांचा अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपला पािठबा देणे अडचणीचे ठरत असेल तर त्यांनी ताराराणी आघाडीला पाठबळ द्यावे, अशी राजकीय चाल खेळल्याचे आज दिसून आले.
महापौर निवडीच्या हालचालींना गेले पाच दिवस गती आली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने एकत्रित सत्ता स्थापन करण्याचा निर्णय सोमवारी रात्री झालेल्या संयुक्त बठकीत केला होता. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी विरोधकांच्या अफवांना बळी न पडता पुढील पाच वष्रे एकत्रित सत्ता स्थापन करण्याचा पुनरुच्चार केला होता. यामुळे आज काँग्रेसकडून महापौरपदासाठी कोणाची उमेदवारी जाहीर होणार, याकडे लक्ष वेधले होते.
काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासमोर त्यांच्या दक्षिण मतदारसंघातील अश्विनी रामाणे की त्यांच्या कसबा बावडा गावातील यवलुजे यांना उमेदवारी द्यायची याचा पेच होता. तो कसा सोडविणार याकडे सकाळपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह विरोधकांचेही लक्ष लागून राहिले होते. अखेर पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाला महत्त्व देत रामाणे यांची उमेदवारी महापौरपदासाठी निश्चित केली. रामाणे यांच्या रूपाने दक्षिण येथील राजकारण मजबूत होण्यास मदत होईल, असा विचार त्यांनी केला. तर बालेकिल्ला असलेल्या बावडय़ातून पुढील काळात कोणत्याही उमेदवाराला निवडून आणता येणे शक्य असल्याने त्यांनी येथील उमेदवारीचा विचार सोडून दिला असावा. त्यानुसार रामाणे यांचे दोन अर्ज भरण्यात आले. तर उपमहापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जाणार असून त्यांच्याकडून शमा मुल्ला यांचे तीन अर्ज नगरसचिव उमेश रणदिवे यांच्याकडे सादर करण्यात आले.
भाजप-ताराराणी आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची डावपेच आखली असल्याचे त्यांच्या उमेदवारीवरून स्पष्ट झाले. महापौरपदासाठी भाजपच्या सविता भालकर, ताराराणीच्या स्मिता माने, तर उपमहापौरपदासाठी भाजपचे संतोष गायकवाड, व ताराराणीचे राजसिंह शेळके यांचे अर्ज दाखल केले. या घडामोडी पाहता १६ तारखेला होणाऱ्या महापौर निवडीत कोण बाजी मारते, हे महत्त्वपूर्ण बनले आहे.