कोल्हापूर : ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध व्यक्त-अव्यक्त पैलू उलगडून दाखविणारा ‘लोकसत्ता’चा ‘राजर्षी’ हा विशेषांक विशेष संदर्भमूल्य असणारा आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या लोकोत्तर कार्याचा समग्र आढावा घेणारा हा अंक संग्राह्य, देखणा आणि वाचनीय झाला आहे,’ असे गौरवोद्गार छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आणि संतसाहित्याचे आणि इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी गुरुवारी काढले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘राजर्षी’ विशेषांकाचे प्रकाशन डॉ. जयसिंगराव पवार आणि डॉ. सदानंद मोरे यांच्यासह कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते गुरुवारी कोल्हापूर येथे झाले. डॉ. जयसिंगराव पवार आणि डॉ. सदानंद यांनी यानिमित्ताने उपस्थितांशी संवाद साधला.
डॉ. पवार यांनी आपल्या विवेचनामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून सांगितले. ते म्हणाले, ‘इतिहास समजून घेण्यासाठी शे-दोनशे वर्षे मागे जाऊन त्याचा वेध घ्यावा लागतो. धर्म, शिक्षण, व्यवसाय, नोकरी या सर्व बाबतीत ब्राह्मणशाहीची मक्तेदारी असण्याच्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी राज्यकारभार स्वीकारला. तत्कालीन परिस्थिती पाहून महाराजांनी आरक्षणाचे धोरण जाहीर केले.’
‘फुले, शाहू, आंबेडकर यांपैकी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. छत्रपती शाहू महाराजांचे केवळ आदेश आणि अवघी १५-१६ भाषणे उपलब्ध आहेत. अशा वेळी फुले, आंबेडकर यांच्या तुलनेत शाहू महाराजांचे वेगळेपण सांगता आले पाहिजे,’ ही बाब डॉ. सदानंद मोरे यांनी अधोरेखित केली. त्यावर डॉ. पवार म्हणाले, ‘महात्मा फुले यांनी विद्येचे महत्त्व खऱ्या अर्थाने ओळखले होते. हे कार्य छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात मोठे केले.
बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्यामुळेच फुले आणि शाहू हे समाज क्रांतिकारक ठरतात. महाराजांचे विश्लेषण करण्यासाठी साधनांची कमतरता असली, तरी महात्मा फुले यांच्या मनातील सामाजिक, सत्यशोधक, शैक्षणिक कार्य शाहू महाराजांनी पुढे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लिहिलेल्या पत्रात ते त्यांना ‘लोकमान्य’ असे संबोधतात. काळाच्या पुढच्या आणि तत्कालीन महाराष्ट्राला न पेलणाऱ्या अनेक गोष्टी महाराजांनी पुढाकार घेऊन केल्या. फुले, शाहू, आंबेडकरांचे कार्य हे नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे. त्यातून या राष्ट्रात सामाजिक न्यायाचा प्रवाह वाहतो आहे.’
डॉ. मोरे म्हणाले, ‘महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांनी वेद नाकारले. तथापि, शाहू महाराज वेदांच्या चौकटीत आपले अधिकार मागत होते. ते ब्राह्मणविरोधी नव्हते, तर स्वतंत्र शंकराचार्य नियुक्त करणारे, वैदिक पाठशाळा काढणारे धर्म क्रांतिकारक होते, या अंगानेही शाहू महाराजांच्या कार्याकडे पाहण्याची, त्याची मांडणी करण्याची गरज आहे.’ ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राला त्याच्या खऱ्या मानकऱ्यांची आठवण करून देणे, त्यांच्या आठवणी जागविणे, या भूमिकेतून ‘लोकसत्ता’ने महाराष्ट्राला ‘महाराष्ट्र’पण प्रदान करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांवर विशेषांक साकारण्याचे ठरविले. ‘राजर्षी’ हा छत्रपती शाहू महाराजांवरील अंक त्याच मालिकेमधील आहे.
सुधारणा हा शब्दही जन्मण्यापूर्वी राजर्षींनी जे कार्य उभे केले, त्यामुळे कोल्हापूर संस्थान महाराष्ट्राच्या सुधारणांचे उमगस्थान ठरले.’ या विशेषाकांचे संयोजन, संपादन करणारे मुकुंद संगोराम यांनी अंकाविषयीची भूमिका मांडली. कुणाल रेगे यांनी सूत्रसंचालन केले. भारती विद्यापीठाचे डॉ. मिलिंद जोशी यांनी आभार मानले. डॉ. जोशी, ‘लोकसत्ता’चे जाहिरात व्यवस्थापक सारंग पाटील, कोल्हापूर विशेष प्रतिनिधी दयानंद लिपारे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.