कोल्हापूर : पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करताना शुक्रवारी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस समोरासमोर आले, त्यांच्यात काही काळ चर्चाही झाली. या भेटीने काही काळ दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला, घोषणाबाजी झाली. तर या भेटीनंतर पुन्हा युतीच्या चर्चांनाही पूर आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागील काही दिवसांपासून राज्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. आज त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पुराचा फटका बसलेल्या शिरोळ येथील निवारा केंद्रात राहत असलेल्या गावकऱ्यांची भेट घेत संवाद साधला. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील आजच शिरोळ तालुक्याच्या पाहणी दौऱ्यावर होते.

या दोन्ही नेत्यांचे पाहणी दौरे गर्दीत शांतपणे सुरू असतानाच अचानक कोणाच्या ध्यानी मनी नसताना हे दोन्ही दिग्गज आमने-सामने आले. शिरोळच्या चौकात हे आजी- माजी मुख्यमंत्री समोरासमोर आले तेव्हा प्रचंड गर्दी झाली. उभयातांमध्ये या वेळी काही काळ संवाद घडला. यानंतर लगेच तर्कवितर्क सुरू झाले. दोघांची भेट पुन्हा युतीचे सत्तासोपान गाठण्यापर्यंत जाणार का, अशी चर्चा रंगली. दोघांच्या कानगोष्टीत काय घडले याचा अंदाज लावण्यात उपस्थित, पूरग्रस्त नागरिक, बघे रंगले. हा संवाद सुरू असतानाच शिवसैनिकांकडून ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

जनहितासाठी कुजबुज…

मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांच्यातील कुजबुज कशासाठी होती हे जाणून घेण्यात सारे दंग होते. अखेर पत्रकारांनीच याविषयी बोलते केल्यावर मंद स्मित करून फडणवीस यांनी भेटीत कसलीही राजकीय गंगा वाहत नसल्याचा खुलासा केला. ताणलेल्या रहस्याचा पडदा दूर करताना फडणवीस म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचा, आम्ही येत आहोत, तुम्ही थांबलात तर बरं होईल असा निरोप आल्याने आम्ही थांबलो व ही भेट झाली. पूरस्थितीच्या परिस्थितीतून तातडीने मार्ग काढावा लागेल. तातडीची मदत दिली पाहिजे. एक कायमस्वरूपी मार्ग काढला पाहिजे अशी ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली.’ हे सारे कथन करून, याला कसलाही राजकीय आयाम जोडला जाऊ नये, अशी टिपणीही त्यांनी केली तरी कृष्णाकाठच्या भेटीचे तरंग उमटतच राहिले.

‘पॅकेज’ असो की मदत, पण घोषणा करा

‘पॅकेज’ म्हणा वा मदत म्हणा, पण पूरग्रस्तांना घोषणा करा,’ अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. पत्रकारांनी ‘पॅकेज’ विषयी विचारणा केली असता ‘मी पॅकेज जाहीर करणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे’, अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यानंतर लगेचच झालेल्या फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर लागलीच पलटवार केला. ते म्हणाले, की आमची हरकत नाही. त्यांनी त्याला ‘पॅकेज’ म्हणावे की मदत, हा त्यांचा मुद्दा आहे. फक्त तुम्ही त्याची घोषणा करावी. सामान्य माणसाला मदत मिळण्याशी मतलब आहे. नुकसान झाल्यानंतर तातडीची मदत राज्य सरकारकडून यायला हवी होती. ती अद्याप आलेली नाही. आपत्ती आल्यानंतरच्या परिस्थितीत ही तातडीची मदत आवश्यक असते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tour of the flooded area chief minister uddhav thackeray leader of opposition devendra fadnavis akp
First published on: 31-07-2021 at 00:46 IST