प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षावर कारवाईची भीती दाखवून लाच स्वीकारणाऱ्या हुपरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल आणि त्याच्या साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचून अटक केली. धनाजी महादेव पाटील असे कॉन्स्टेबलचे नाव आहे. याच पोलीस ठाण्यातील आणखी एका कॉन्स्टेबलवर ३ महिन्यांपूर्वी कारवाई झाली होती. त्यामुळे पोलिसांच्या कार्यकुशलतेची चर्चा हुपरीत सुरू होती.
हुपरी-कागल या मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाकडे कॉन्स्टेबल धनाजी पाटील याने कायदेशीर कारवाईची भीती दाखवून महिन्याला तीनशे रुपयेप्रमाणे दोन महिन्यांचे ६०० रुपयांची मागणी केली होती. रिक्षाचालकाने ४०० रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. पाटील याने सदरची रक्कम साथीदार राजेंद्र बोंगार्डे याच्याकडे देण्यास सांगितले होते. रिक्षाचालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ६ जानेवारी रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार हुपरी पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचला. या वेळी राजेंद्र बोंगार्डे याला तक्रारदार रिक्षाचालकाकडून ४०० रुपये स्वीकारताना पकडले. पोलीस कॉन्स्टेबल धनाजी पाटील यालाही ताब्यात घेतले आहे.