निवडणुकीत पसे वाटण्याच्या कारणावरून सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा – ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्याशिवाय दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांचे कार्यालय फोडण्याबरोबरच गाडय़ांचीही तोडफोड करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, शहर अध्यक्ष राजेश लाटकर यांच्या मोटारींवर हल्ला चढविण्यात आला. या घटनेमुळे सदर बझार आणि कदमवाडी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा-ताराराणी आघाडीमधील वाद गेल्या काही दिवसांपासून धुमसत आहे. सोमवारी हा वाद उफाळून आला. भाजपा-ताराराणी आघाडीचे उमेदवार सत्यजित कदम यांचे बंधू सुनिल कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश लाटकर यांच्यात पसे वाटपाच्या संशयावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे कदमांच्या कार्यकर्त्यांनी लाटकर यांना मारहाण केली. या घटनेची माहिती समजताच संतप्त लाटकर समर्थकांनी भाजपा-ताराराणी आघाडीचे प्रभाग क्रमांक ७ मधील उमेदवार सत्यजित कदम यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात कार्यालयाची प्रचंड तोडफोड करण्यात आली. त्याशिवाय कार्यालयाबाहेर असलेल्या गाडय़ांचीही मोडतोड केली. या घटनेनंतर कदम यांच्या समर्थकांनी लाटकर यांच्या घरावर प्रचंड दगडफेक करतानाच त्यांच्या घरासमोर लावलेल्या गाडय़ा उलथून टाकत, प्रचंड नासधूस केली.
दगडफेक आणि मारामारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्वरित लाटकर यांच्या घरी भेट दिली. तसेच कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. या परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.