कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांचा पदभार काढून घेतल्यानंतर रविवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांना यावरून कोल्हापूरकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कोल्हापुरातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नाईकवाडे यांना पदावरून तात्काळ का हटवले, असा जाब पालकमंत्र्यांना विचारला. यावेळी देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार हेही उपस्थित होते.
देवस्थान समितीचे सचिव शिवराय नाईकवाडे यांना पदावरून तात्काळ बाजूला करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढल्यानंतर कोल्हापूरकरांमध्ये त्या विरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचा प्रत्यय आज पालकमंत्री केसरकर यांना आला. ते महालक्ष्मी दर्शनासाठी आले असताना आला.
प्रश्नांचा भडिमार
कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी केसरकर यांना घेराव घातला. नाईकवाडे यांच्यासारखे कार्यक्षम अधिकारी नको आहेत का, भ्रष्टाचार रोखणाऱ्या अधिकाऱ्यांचे वावडे आहे का, त्यांना पदमुक्त का करण्यात आले, आले चोर सोडून संन्यासाला फाशी दिली जात आहे का, त्यांच्याकडे पुन्हा पदभार सोपवावा, अशा प्रश्नांचा भडिमार केसरकर यांच्यावर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांची मनमानी सहन केली जाणार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या.
सेवावृत्त संघटनेचे अध्यक्ष संभाजी साळुंखे, भाजपचे माजी नगरसेवक किरण नकाते, शाहू प्रेमी संघटनेचे उमेश पोवार, बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, निलेश सुतार यांनी पालकमंत्र्यांना अनेक प्रश्न उपस्थित केले.
यासाठी बदली
देवस्थान समितीचे महसूल विषयक काही प्रश्न आहेत. त्यासाठी उप विभागीय अधिकारी यांच्याकडे देवस्थान सचिव पदभार देण्यात आला आहे. हे कामे मार्गी लागल्यानंतर नाईकवाडे यांना आणण्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन केसरकर यांनी दिले.