अभिषेकासह भजन, प्रवचन, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाशिवरात्री मोठय़ा उत्साहात आणि भक्तिभावात सोमवारी संपन्न झाली. शंभो.. शंकरा..च्या गजरात महादेवाला शहरासह जिल्ह्यात महादेवाला रुद्राभिषेक करण्यात आला. या सर्वच मंदिरांत आज विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात पहाटेपासूनच रुद्राभिषेक, महारुद्राभिषेक, प्रसाद वाटप असे अनेक कार्यक्रम करण्यात आले.
शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेल्या अतिबलेश्वर, काशी विश्व्ोश्वर, कपिलतीर्थ आदींसह उत्तरेश्वर, ऋणमुक्तेश्वर, रावणेश्वर, चंद्रेश्वर, वटेश्वर, कैलासगडची स्वारी, लक्षतीर्थ, कोटीतीर्थ सोमेश्वर आदी शिवमंदिरांची रंगरंगोटी करून केळीचे खांब, फुलांच्या माळा व विद्युत रोषणाईने मंदिरे उजाळून निघाली होती.
स्टँड परिसरातील वटेश्वर मंदिरात भाविकांसाठी दर्शन रांगा उभारण्यात आल्या होत्या. उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिर आवारात महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी यात्रा भरते. यंदाही ही यात्रा भरवण्यात आली होती. यासाठी प्रसाद दुकानांची उभारणी करण्यात आली होती. याशिवाय महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कित्येक मंदिरांमध्ये महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
शुक्रवार पेठ येथील श्री ऋणमुक्तेश्वर मंदिर व तालीम मंडळाच्या स्थापनेचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने मोठय़ा दिमाखात शिवोत्सव करण्यात आला. विविध धार्मिक आणि गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवमूर्तीस महाभिषेक व महापूजा करण्यात आली. ५ वाजता भव्य पालखी सोहळाही झाला. छत्रपती मालोजीराजे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, ऋतुराज पाटील, जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी सोहळय़ास प्रारंभ झाला. आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसादाचे वाटप झाले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2016 रोजी प्रकाशित
महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यकम
मंदिरात पहाटेपासूनच रुद्राभिषेक, महारुद्राभिषेक, प्रसाद वाटप
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-03-2016 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various religious ceremony on the occasion of mahashivratri