इचलकरंजी येथील साईनगर परिसरातील तरुण यंत्रमागधारकाचा इलेक्ट्रिक मोटारीचा शॉक लागून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला. उमेश बी. शेट्टी (वय ३२, रा. लिगाडे मळा) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसात करण्यात आली आहे.
साईनगर गल्ली नं. तीनमध्ये असलेला संजय पांडुरंग पोवार यांचा कारखाना उमेश शेट्टी यांनी चालविण्यास घेतला होता. या कारखान्यात उमेश स्वतही काम करीत असे. बुधवारी दुपारच्या सुमारास काम करत असताना यंत्रमागावरील इलेक्ट्रिक मोटारीचा उमेश यांना शॉक लागला. त्यामध्ये उमेश हे जागीच कोसळले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने पालिकेच्या आयजीएम इस्पितळात उपचारासाठी दाखल केला. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. एका तरुण यंत्रमागधारकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. उमेश यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.