विंडीजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी निवडलेल्या संघात महेंद्रसिंह धोनी आणि ऋषभ पंत दोघांची निवड करण्यात आली आहे. चाहते आणि जाणकारांच्या मते पंत हा धोनीला पर्याय म्हणून संघात होता. त्यामुळे धोनीच्या कारकिर्दीविषयी चर्चा सुरु झाली आणि त्याच्या निवृत्तीच्याबाबत पुन्हा चर्चा रंगू लागल्या. पण असे असले तरी दक्षिण अफ्रिकेचा स्टार खेळाडू अब्राहाम डीव्हिलियर्स याने मात्र धोनीबाबत महत्वाचे विधान केले आहे.

धोनीचे वय ८० झाले आणि तो व्हीलचेअरवर जरी असेल, तरीही त्याची मी माझ्या संघात निवड करेन, असे विधान डीव्हिलियर्स याने केले आहे. एका मुलाखती दरम्यान धोनीच्या निवृत्तीसंदर्भात डीव्हिलियर्सला विचारले असता त्याने हे उत्तर दिले.

डीव्हिलियर्स म्हणाला की, ‘धोनीच्या निवृत्तीबाबत तुम्ही माझी चेष्टा करत आहात का? मी धोनीला दरवर्षी माझ्या संघात स्थान देणारच. तो ८० वर्षाचा झाला आणि अगदी व्हीलचेअर वर असला तरीही तो माझ्या संघात असेल. धोनीची कारकीर्द पाहा. असे रेकॉर्ड असलेला खेळाडू संघाबाहेर असू शकतो? माझ्या संघात तर मी नक्कीच त्याला वगळणार नाही, असे त्याने ठामपणे सांगितले.