शारजा येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात आरोन फिंचच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ८ गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या मालिकेत १-० अशी आघाडी लाभली आहे.

कर्णधार फिंचने १३५ चेंडूंमध्ये केलेल्या ११६ धावांच्या खेळीमुळेच ऑस्ट्रेलियाने ४९ व्या षटकातच पाकिस्तानचे २८१ धावांचे आव्हान गाठले. फिंचच्या एकदिवसीय सामन्यांतील बाराव्या शतकामुळेच हा विजय शक्य झाला. मात्र,त्यामुळे पाकिस्तनाच्या युवा हॅरीस सोहेलच्या कारकीर्दीतील पहिल्या शतकी खेळीला झाकोळून टाकले. फिंचने त्याच्या शतकी खेळीत चार षटकार आणि आठ चौकार लगावले. त्याला शॉन मार्शने १०२ चेंडूत नाबाद ९१ धावा करीत चांगली साथ दिली.

एकदिवसीय विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानने त्यांचा नियमित कर्णधार सर्फराज अहमदसह सहा प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. त्यामुळे अनुभवी मलिकच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा नवखा संघच या सामन्यात खेळला. मात्र, पाकिस्तानच्या या नवख्या संघानेदेखील ऑस्ट्रेलियाला तुल्यबळ लढत दिली. पाकिस्तानकडून शान मसूद ४०, हॅरीस सोहेल नाबाद १०१ आणि उमर अकमल ४८ यांनी दमदार फलंदाजी करत संघाला पावणेतीनशे धावांच्या पल्याड पोहोचवले. मात्र ऑस्ट्रेलियाने ते आव्हानदेखील पार करीत मालिकेला विजयी प्रारंभ केला.

संक्षिप्त धावफलक

  • पाकिस्तान : ५० षटकांत ५ बाद २८० (हॅरीस सोहेल १०१, उमर अकमल ४८; कोल्टर नाईल २/६१) पराभूत वि.
  • ऑस्ट्रेलिया : ४९ षटकांत २ बाद २८१ (आरोन फिंच ११६, शॉन मार्श नाबाद ९१; मोहम्मद अब्बास १/४४)