जोआ सौसावर मात ; इव्हानोव्हिक पराभूत; वॉवरिन्का-राओनिकची आगेकूच

इंग्लंडचे आशास्थान असलेल्या अँडी मरेने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पोतुर्गालच्या जोआ सौसावर विजय मिळवत चौथ्या फेरीत आगेकूच केली. मात्र लढतीदरम्यान सासरे कोसळल्याने मरेचा विजय झाकोळला गेला. मरेच्या सासऱ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अन्य लढतींमध्ये स्टॅनिसलॉस वॉवरिन्का, मिलास राओनिक यांच्यासह व्हिक्टोरिया अझारेन्का, अँजेलिक्यू कर्बर यांनी विजयी वाटचाल केली. मात्र अ‍ॅना इव्हानोव्हिकला गाशा गुंडाळावा लागला.

सौसाविरुद्धच्या याआधीच्या सहा लढतींमध्ये मरेने विजय मिळवला होता. राफेल नदालच्या साथीने सराव करणाऱ्या सौसाने मरेला विजयासाठी संघर्ष करायला भाग पाडले. मरेने या लढतीत ६-२, ३-६, ६-२, ६-२ असा विजय मिळवला. दुसरा सेट जिंकत सौसाने मरेला दणका दिला. मात्र पुढचे दोन्ही सेट जिंकत मरेने सौसाला खळबळजनक विजयापासून रोखले. स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने ल्युकास रोसोलवर ६-२, ६-३, ७-६ (७-३) अशी मात केली.

गेल्या वर्षी फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या वॉवरिन्काने यंदाच्या वर्षांची सुरुवात चेन्नई खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासह केली आहे. मिलास राओनिकने व्हिक्टर ट्रॉइस्कीला ६-२, ६-३, ६-४ असे नमवले. अटीतटीच्या लढतीत जॉन इस्नरने फेलिसिआनो लोपेझवर ६-७ (८-१०), ७-६ (७-५), ६-२, ६-४ अशी मात केली. गेइल मॉनफिल्सने स्टीफन रॉबर्टवर ७-५, ६-३, ६-२ असा विजय मिळवला.

महिलांमध्ये बार्बेरा स्टारायकोव्हाने गार्बिन म्युग्युरुझाचा ६-३, ६-२ असा धुव्वा उडवला. दुखापतीतून सावरलेल्या व्हिक्टोरिया अझारेन्काने नओमी ओसाकावर ६-१, ६-१ असा सहज विजय मिळवला. अमेरिकेच्या मॅडिसन की हिने अ‍ॅना इव्हानोव्हिकला ४-६, ६-४, ६-४ असे नमवत सनसनाटी विजयाची नोंद केली. एकाटेरिना माकारोव्हाने कॅरोलिन प्लिसकोव्हाचा ६-३, ६-२ असा पराभव केला. अँजेलिक्यू कर्बरने मॅडिसन ब्रेंगलवर ६-१, ६-३ अशी मात केली.

सानियाची आगेकूच

दिमाखदार फॉर्ममध्ये असणाऱ्या सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. अव्वल मानांकित सानिया-मार्टिना जोडीने ल्युडमुला किचेनोक आणि नाडिआ किचेनोक जोडीवर ६-२, ६-३ असा विजय मिळवला. पुढच्या सामन्यात या जोडीची लढत स्वेतलाना कुझनेत्सोव्हा आणि रॉबर्टा व्हिन्सी जोडीशी होणार आहे. मिश्र दुहेरीत, सानियाने इव्हान डोडिगच्या साथीने खेळताना अजला टॉमलिजॅनोव्हिक आणि निक कुर्यिगास जोडीवर ७-५, ६-१ अशी मात केली. पुढच्या लढतीत या जोडीसमोर ऐसाम अल हक कुरेशी आणि यारोस्लोव्हा श्वेडोव्हा जोडीचे आव्हान असणार आहे. कनिष्ठ गटात दहाव्या मानांकित प्रांजला याडापल्लीने जपानच्या मयुका ऐकवाला ६-४, ५-७, ६-१ असे नमवले. करमन थांडीने ऑस्ट्रेलियाच्या ओलिव्हिआ गाडेकीचा ६-३, ६-४ असा पराभव केला.