सध्या सुरू असलेल्या ऑरलियन्स मास्टर्स सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतने मलेशियाच्या चिम जून वेईचा 21-17, 22-20 असा पराभव करून अंतिम आठमध्ये स्थान मिळविले.

श्रीकांतपूर्वी सायना नेहवाल आणि इरा शर्मा यांनीही आपापले सामने जिंकून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गुरुवारी सायनाने फ्रान्सच्या मारो बॅटोमेनेला 18-21, 21-15, 21-10 असे पराभूत केले.  उपांत्यपूर्व फेरीत तिचा मलेशियाच्या इरिस वांगशी किंवा फ्रान्सच्या याईली होयॉक्स यांच्या लढतीतील विजयी खेळाडूशी सामना होईल.  दुसरीकडे इराने बल्गेरियाच्या मारिया मिटसोव्हाचा 21-18 21-13 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

दरम्यान, मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि अश्विनी पोनप्पा आणि पुरुष दुहेरीत कृष्णा प्रसाद गारगा आणि विष्णू वर्धन गौर पंजला यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली. मिश्र दुहेरीत कपिला आणि अश्विनीने 32 मिनिटांच्या सामन्यात इंग्लंडची जोडी कॅलम हेमिंग आणि व्हिक्टोरिया विल्यम्सचा 21-12, 21–18 असा पराभव केला.

पुरुष दुहेरीत कृष्णा व पंजाला यांनी डॅनिश जोडी ख्रिस्तियन होल्ड क्रेमर व मार्क्स रीधज यांना अवघ्या 28 मिनिटात 21-17, 21-13 असे पराभूत केले.

पुरुष एकेरीत मिथुन मंजुनाथचे आव्हान संपुष्टात आले. जर्मनीच्या काय शॅफरने त्याचा 23-21, 9-21, 24-22 असा पराभव केला. हा सामना एक तास आणि 19 मिनिटे चालला.