इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना प्रतिकूल परिस्थितीतही गोलंदाजी केल्याचा मला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत फायदा झाला, अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने व्यक्त केली.

२७ वर्षीय चहरने रविवारी बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात ७ धावांत ६ बळी मिळवले. चहरच्या या यशात महेंद्रसिंह धोनीचेसुद्धा मोठे योगदान आहे, अशीच चर्चा सध्या क्रिकेटविश्वात सुरू आहे.

‘‘चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर अनेक सामने खेळल्यामुळे मला दव आणि दमट वातावरणातही गोलंदाजी करण्याची कला अवगत झाली. चेंडू टाकण्यापूर्वी स्वत:चे हात कसे सुके करावे, हाताला माती लावून गोलंदाजी करावी जेणेकरून चेंडूवरील पकड सुटणार नाही, यांसारख्या गोष्टी मी त्या वेळी शिकलो. त्यामुळेच नागपूरच्या आव्हानात्मक परिस्थितीतसुद्धा मी चमकदार कामगिरी करू शकलो,’’ असे चहर म्हणाला.

हॅट्ट्रिकवीर चहरची ८८ स्थानांनी आगेकूच

दुबई : भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहरला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात हॅट्ट्रिकसह ७ धावांत ६ बळी घेण्याची किमया साधल्याचा चांगलाच फायदा झाला आहे. चहरने सोमवारी ‘आयसीसी’च्या जागतिक गोलंदाजी ट्वेन्टी-२० क्रमवारीत चक्क ८८ स्थानांनी सूर मारून ४२वे स्थान पटकावले. रविवारी झालेल्या सामन्यापूर्वी चहर १३०व्या स्थानी होता. भारताचा एकही गोलंदाज अव्वल १० खेळाडूंमध्ये नाही. फलंदाजीत भारताचा रोहित शर्मा (६७७) सातव्या क्रमांकावर असून लोकेश राहुलने (६६०) एका स्थानाने आगेकूच करताना आठवा क्रमांक मिळवला आहे. सांघिक क्रमवारीत भारत (२६०) पाचव्या स्थानी पाकिस्तान आणि इंग्लंड अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहे.