ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केलं. भारतीय बॅडमिंटन टीमला राष्ट्रकुल स्पर्धेच्या सांघिक प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळालं असून, ही या खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.  सांघिक प्रकारातील सामन्यांदरम्यान सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत या खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या. या खेळाडूंनीही चाहत्यांची निराशा केली नाही. हे यश किदम्बी श्रीकांतसाठी दुहेरी आनंद साजरा करण्याचं आणखी एक कारणही ठरत आहे. सांघिक प्रकारात मिळालेल्या यशानंतर जागतिक क्रमवारीत श्रीकांतची सरशी पाहायला मिळाली असून, येत्या काही दिवसांमध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्ल्यूएफ) जाहीर करणाऱ्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आरुढ होणार आहे.

फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालसोबत या यादीत समाविष्ट होणारा श्रीकांत हा दुसरा भारतीय बॅडमिंटपटू ठरत आहे. गेल्या वर्षी दुखापतीमुळे जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान मिळवण्याची त्याची संधी हुकली होती. पण, आता मात्र त्याने पुन्हा एकदा आपल्या खेळाच्या बळावर हे स्थान मिळवण्याचा निर्धार केल्याचं पाहायला मिळत आहे. आधुनिक क्रमवारीच्या आकड्यांनुसार या क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचणारा श्रीकांत हा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरणार आहे. याआधी संगणकीय क्रमवारीची सुरुवात होण्यापूर्वी प्रकाश पदुकोण यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

वाचा : जास्त डोकं चालवू नकोस…काश्मीर प्रश्नावरुन केलेल्या आफ्रिदीच्या वक्तव्याला भारताच्या गब्बरचं सडेतोड उत्तर

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात श्रीकांतने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. २०१७ मध्ये त्याने इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि फ्रान्समधील चारही सुपर सीरिजचं विजेतेपद मिळवलं होतं. या सर्व स्पर्धा जिंकणारा तो चौथा भारयीय खेळाडू ठरला होता. टप्प्याटप्प्याने यशशिखरावर पोहोचू पाहणाऱ्या श्रीकांतला जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान मिळणं ही संपूर्ण भारतीय क्रीडाजगतासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब ठरणार आहे यात शंका नाही.