भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मध्यंतरी परदेश दौऱ्यांमध्ये पत्नीला पूर्णवेळ राहू देण्याची मागणी केली होती. ज्यावर बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने यावर त्वरित निर्णय घेतला जाणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र मुंबई मिरर वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, क्रिकेट प्रशासकीय समितीने नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत खेळाडूंच्या मागणीवर ‘फॅमिली टाइम’ हा तोडगा काढल्याचं समजतं आहे. याबद्दल कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसून यावर विचार सुरु असल्याची माहिती आहे.

सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड आपल्या खेळाडूंसाठी फॅमिली टाइम ही संकल्पना राबवतं. प्रत्येक परदेश दौऱ्याआधी बोर्डाचे प्रतिनीधी खेळाडूंच्या संघटनेच्या प्रतिनीधींसोबत एकत्र बसून, खेळाडूंना आपल्या पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवता यावा यासाठी राखीव वेळेचं नियोजन करतं. प्रत्येक दौरा आणि त्याचा कालावधी याप्रमाणे या वेळेचं निजोयजन केलं जातं. क्रिकेट प्रशासकीय समितीने अशी संकल्पना भारतीय खेळाडूंसाठी राबवली जाऊ शकते का याबद्दल चाचपणी सुरु केल्याचं कळतंय.

मात्र आगामी 2019 विश्वचषकाचं नियोजन पाहता, बीसीसीआय आपल्या सध्याच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत नाहीये. बीसीसीआयच्या सध्याच्या नियमांनुसार, परदेश दौऱ्यांमध्ये पत्नीला 2 आठवड्यांच्या सोबत राहता येत नाही. याच नियमामध्ये बदल करावा अशी मागणी मध्यंतरी विराट कोहलीने बीसीसीआयशी केली होती.