News Flash

हवाईसेविका ते ‘मिस-मुंबई’!

खडतर परिस्थितीवर मात करणाऱ्या रेणुका मुदलियारचा संघर्षप्रवास

(संग्रहित छायाचित्र)

तुषार वैती

घरची परिस्थिती बेताची तसेच लहानपणीच वडिलांना गमावल्याचे दु:ख कुरवाळत न बसता एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रेणुका मुदलियार हिने स्वत:च्या हिमतीवर मोठे यश संपादन केले आहे. लग्नाआधी घरात तोकडे कपडे घालण्याचीही परवानगी नसताना केवळ पतीच्या पाठिंब्यामुळे बिकिनी घालून मंचावर अवतरत हवाईसेविका असलेल्या रेणुकाने ‘मिस-मुंबई’ या मानाच्या किताबाला गवसणी घातली.

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मल्यानंतर दीड वर्षांची असतानाच रेणुकाच्या वडिलांना देवाज्ञा झाली. आईने काबाडकष्ट करून चार भावंडांचा सांभाळ केला. पण १२वीनंतर रेणुकाला शिक्षण सोडावे लागले. पण नंतर शिक्षणाचे महत्त्व समजल्यानंतर नोकरी करतानाच तिने एमबीएची पदवी घेतली. नंतर हवाईसेविका म्हणून स्पाइसजेटमध्ये कार्यरत असणाऱ्या रेणुकाने शरीराची ठेवण व्यवस्थित करण्यासाठी जिमची पायरी चढली. स्वत:च्या मेहनतीने शरीरसंपदा कमावणे कठीण असल्यामुळे तिने वैयक्तिक प्रशिक्षकही नेमला. पण याच प्रशिक्षकाशी सूत जुळल्यानंतर त्यानेच फिजिक फिटनेस प्रकाराकडे वळण्याचा सल्ला रेणुकाला दिला. बिकिनी घालून महिलासुद्धा आपल्या शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करतात, हेसुद्धा तिला माहीत नव्हते. पण पती शरीरसौष्ठवाच्या क्षेत्रात असल्याने त्यानेच बिकिनी परिधान करून शरीरसौष्ठवाकडे वळण्याचा सल्ला दिला आणि रेणुकाचा शरीरसौष्ठवातील प्रवास सुरू झाला.

‘‘पहिल्यांदा बिकिनी घालून उतरणे माझ्यासाठी कठीण होते. यासाठी घरच्यांचे मन वळवणे अशक्य होते. पण नवऱ्याचा पाठिंबा असल्याने माझ्या आईनेही मला साथ दिली. सासू-सासऱ्यांच्या परवानगीशिवाय मी दोन स्पर्धामध्ये उतरले. पण त्यांना ही परिस्थिती समजली तेव्हा काहीशा नाराजीनंतर त्यांनीही आम्हाला पाठिंबा दिला. आता घरच्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मला या खेळात मोठे यश संपादन करायचे आहे,’’ असे रेणुका आत्मविश्वासाने सांगत होती.

बिकिनीसह मंचावर उतरणे किती खडतर असते, याविषयी रेणुका म्हणाली, ‘‘बिकिनी घालून अनेकदा आम्ही मंचावर उतरतो, तेव्हा आजूबाजूचे वातावरण आमच्यासाठी सोयीस्कर नसते. पुरुषांच्या वाईट नजरा आमच्या शरीरावर खिळलेल्या असतात. पण त्याकडे दुर्लक्ष करून स्वत:चे संतुलन बिघडू न देता आम्हाला फक्त कामगिरीवर लक्ष केंद्रित करावे लागते. मला फक्त परीक्षक आणि समोर दिसणारा चषक दिसत असतो.’’

‘‘गेल्या वर्षी ‘महाराष्ट्र-श्री’ स्पर्धेदरम्यान लोकांच्या वाईट नजरा आमच्या शरीराचा वेध घेत होत्या. काही जण अपशब्दही उच्चारत होते. आता काहीही होईल, या भीतीने हृदयाचे ठोके वाढले होते. आमच्यावर कोणताही वाईट प्रसंग ओढवला असता. पण सोबत असलेल्या पुरुष सहकाऱ्यांच्या मदतीमुळे अनर्थ होऊ शकला नाही,’’ अशा शब्दांत कटू प्रसंगाच्या आठवणीही तिने सांगितल्या.

‘‘आता ‘मिस-मुंबई’ किताब जिंकल्यानंतर मी स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. गेल्या महिनाभरात मी जिंकलेले हे तिसरे विजेतेपद आहे. आता ‘मिस-ऑलिम्पिया’ किताब पटकावणे माझे मुख्य स्वप्न आहे. त्यासाठी स्वत:च्या शरीराची बांधणी अधिक चांगली करावी लागणार आणि खडतर मेहनत घ्यावी लागणार, याची मला कल्पना आहे,’’ असेही रेणुकाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2020 1:27 am

Web Title: air hostess to miss mumbai renuka mudaliyar abn 97
Next Stories
1 राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : महाराष्ट्राच्या महिलांना साखळीत खडतर आव्हान
2 ऑलिम्पिक पात्रता स्पर्धाचा कालावधी वाढवावा!
3 Ind vs NZ : अजिंक्यची ही आतापर्यंत सर्वात खराब खेळी – हरभजन सिंह
Just Now!
X