News Flash

पुरुषांमध्ये एअर इंडियाची आणि महिलांमध्ये पेट्रोलियमची बाजी

महिलांच्या अंतिम सामन्यात पेट्रोलियम क्रीडा मंडळाच्या संघाला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या संघाने कडवी झुंज दिली.

राष्ट्रीय कॅरम स्पर्धेच्या पुरुष गटातील विजेता एअर इंडियाचा संघ .

राष्ट्रीय कॅरम स्पर्धा

कुडाळच्या वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे चालू असलेल्या ४७व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या आंतरसंस्था सांघिक पुरुष गटामध्ये एअर इंडियाने, तर महिला गटामध्ये पेट्रोलियम क्रीडा मंडळाने बाजी मारली.

रिझव्‍‌र्ह बँकेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू झहीर पाशाने एअर इंडियाच्या झैद अहमदला १५-९, २३-१७ असे पराभूत करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती; परंतु एअर इंडियाच्या अनुभवी विश्वविजेत्या आर. एम. शंकरा व राष्ट्रीय विजेत्या एम. नटराज जोडीने रिझव्‍‌र्ह बँकेच्या सूर्यप्रकाश व व्ही. आकाश जोडीला २५-९, २५-१७ असे हरवून सामन्यात अशी बरोबरी साधली. मग तिसऱ्या निर्णायक लढतीत पहिल्यांदाच एअर इंडियाकडून खेळणाऱ्या संदीप दिवेने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने रिझव्‍‌र्ह बँकेच्या विश्वविजेत्या प्रशांत मोरेविरुद्ध पहिला सेट २५-२ असा सहज जिंकून विजयाकडे आगेकूच केली; परंतु प्रशांतने दुसरा सेट कसाबसा २३-२२ असा जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्ये संदीपने २५-४ असे प्रशांतला पराभूत करून एअर इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तृतीय क्रमांकाच्या लढतीत जैन इरिगेशनने विजय संपादन केला. त्यांनी बलाढय़ पेट्रोलियम संघाला २-१ असे हरविले.

महिलांच्या अंतिम सामन्यात पेट्रोलियम क्रीडा मंडळाच्या संघाला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या संघाने कडवी झुंज दिली. विश्वविजेत्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एस. अपूर्वाने पेट्रोलियमच्या माजी विश्वविजेत्या रश्मी कुमारीला १९-१३, २५-४ असे हरवून संघाला आघाडी मिळवून दिली होती. पेट्रोलियमच्या झ्लावझकीने-परिमला जोडीने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या परिमी निर्मला-दीपाली सिन्हा जोडीविरुद्ध १०-२३ असा पहिला सेट गमाविल्यानंतरही दुसरा व तिसरा सेट २५-१७, २०-१४ असा जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सामन्यात पेट्रोलियमची आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल कुमारीला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या मेधा मठकरीविरुद्ध विजयासाठी झगडावे लागले. काजलने हा सामना १६-१७, १९-१०, २५-६ असा खिशात घालत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तृतीय क्रमांकासाठीच्या लढतीत जैन इरिगेशनच्या संघाने बीएसएनएलवर २-१ असा विजय मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 12:53 am

Web Title: air india in men and petroleum stake in women
Next Stories
1 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याचा निर्णय सरकारशी चर्चेनंतरच!
2 श्रीलंका विजयाच्या उंबरठय़ावर
3 ‘पाकिस्तानशी क्रीडा संबंध तोडू नका’
Just Now!
X