मुंबईकर आणि मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे हा भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मधल्या फळीतला भरवशाचा फलंदाज अशी दुहेरी भूमिका सांभाळणाऱ्या अजिंक्यने आतापर्यंत अनेकदा मैदानात आपली चमक दाखवली आहे. फलंदाजीचं तंत्र, फटके खेळण्याची पद्धत या सर्व गोष्टींमुळे अजिंक्य रहाणे कसोटी क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. भारतीय संघातला हा मराठमोळा खेळाडू आज आपला ३२ वा वाढदिवस साजरा करतो आहे. आतापर्यंत आपण अजिंक्यला कसोटी, वन-डे किंवा आयपीएलमध्ये फलंदाजी करताना पाहिलं असेल. पण आज आम्ही तुम्हाला अजिंक्यचा मैदानातला असा एक कारनामा सांगणार आहोत जो तुम्हाला कदाचीतच माहिती असेल.

आयपीएलमध्ये अजिंक्यने मुंबई इंडियन्सकडून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. २०११ साली अजिंक्य राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळायला लागला. यानंतर २०२० सालच्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने अजिंक्यला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही गोलंदाजी करायची संधी न मिळालेल्या अजिंक्यने आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना एकदा गोलंदाजी करुन आपल्या संघाला एक विकेटही मिळवून दिली आहे.

२००९ साली आयपीएलचा हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला. सेंच्युरिअनच्या मैदानावर मुंबई विरुद्ध पंजाब असा सामना रंगला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना युवराज सिंहच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने १२ षटकांत ७९ धावा करत ६ बळी गमावले होते. सेंच्युरिअनची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करत होती. हरभजन सिंह आणि जे.पी.ड्युमिनी या फिरकीपटूंनी प्रत्येकी ३-३ बळी घेत पंजाबच्या डावाला खिंडार पाडलं होतं. कर्णधार सचिन तेंडुलकरने ही संधी साधत अजिंक्य रहाणेला १५ व षटक टाकायला दिलं. अजिंक्यनेही आपल्या कर्णधाराने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत ल्युक पॉमर्सबॅचचा त्रिफळा उडवला. या षटकात अजिंक्यने ५ धावा देत १ बळी घेतला. आयपीएलमधली अजिंक्य रहाणेही ही पहिली आणि एकमेव विकेट ठरली. या सामन्यात पंजाबचा संघ ११९ धावांपर्यंतच मजल मारु शकला. मुंबईने हे आव्हान ८ गडी राखून पूर्ण केलं होतं.