तिसऱ्या कसोटीच्या निवड प्रक्रियेकडे सर्वाचे लक्ष

मानहानीकारक पराभवामुळे भारतीय संघ टीकेचा धनी ठरत आहे आणि त्याचे मूळ कारण संघनिवड प्रक्रिया असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटी सामन्याच्या संघनिवडीवर साऱ्यांचे लक्ष लागलेले असेल. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये संघाचा उपकर्णधार आणि परदेशात चांगल्या धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेला वगळण्यात आले होते. त्याच्या जागी संघात स्थान दिलेल्या रोहित शर्माला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी संघ निवडताना रोहितच्या जागी अजिंक्यला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांमध्ये रोहितने एक शतक आणि दोन अर्धशतके नोंदवली होती. त्याचबरोबर गेल्या मोसमात रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२०० धावा केल्या होत्या. त्याचा हा फॉर्म पाहता त्याला दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये स्थान देण्यात आले, पण एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट यांच्यातील फरक कर्णधार, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन यांना समजला नसावा. त्यामुळेच आतापर्यंतच्या कसोटी सामन्यांमध्ये ५४ची सरासरी असताना अजिंक्यला वगळण्याचा अनाकलनीय निर्णय त्यांनी घेतला होता; पण हा निर्णय त्यांच्यावर उलटला असून त्याचे रूपांतर पराभवात झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात तरी भारतीय संघ व्यवस्थापन ही घोडचूक सुधारणार का, याकडे साऱ्यांची नजर असेल. अजिंक्यला गेल्या कसोटी मालिकेत फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती; पण परदेशातील कसोटी सामन्यांमध्ये त्याच्याकडून सातत्यपूर्ण फलंदाजी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात तरी त्याला संधी मिळेल, असे वाटले होते. पहिल्या कसोटीत रोहित अपयशी ठरल्यावर अजिंक्य संघात येईल, अशी आशा होती, पण दुसऱ्या कसोटीत संघाच्या उपकर्णधाराला पाणक्याची भूमिका वठवावी लागली होती.

अजिंक्यबरोबरच भुवनेश्वर कुमारवरही संघ व्यवस्थापनाकडून अन्याय झाल्याचेच पाहायला मिळाले आहे. पहिल्या सामन्यात भुवनेश्वरने अचूक मारा केला होताच, पण त्याचबरोबर उपयुक्त फलंदाजीही केली होती. चांगली कामगिरी करूनही त्याला दुसऱ्या सामन्यासाठी डच्चू देण्यात आला होती. पहिल्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी न केलेल्या शिखर धवनला वगळून लोकेश राहुलचा दुसऱ्या सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला होता. या साऱ्या गोष्टींचा खेळाडूंच्या मानसिकतेवर किती परिणाम होतो, याचा विचार संघ व्यवस्थापन करणार का? हा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. कारण जर चांगली कामगिरी करूनही तुम्हाला वगळण्यात येते, तर तुमच्याकडून नेमके काय अपेक्षित आहे, हे संघ व्यवस्थापनाने सर्वप्रथम सांगणे भाग आहे. भुवनेश्वरला दुसऱ्या सामन्यासाठी वगळताना संघ व्यवस्थापनाने नेमका काय विचार केला असावा, हेदेखील समजण्यापलीकडचे आहे. त्याचबरोबर तिसऱ्या सामन्यात अजिंक्यला संधी दिली आणि त्याने दमदार फलंदाजी केली तर पराभवाची जबाबदारी संघ व्यवस्थापन स्वीकारणार का, याचे उत्तर चाहत्यांना अपेक्षित आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठीची खेळपट्टी पाहिली तर तिच्यावर हिरवेगार गवत पाहायला मिळते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगला फायदा मिळू शकतो. भारताच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगला मारा केला आहे; पण या सामन्यासाठी गोलंदाज निवडताना संघ व्यवस्थापनाचा कस लागणार आहे. कारण तिसऱ्या सामन्यासाठी जर भुवनेश्वरला संधी द्यायची असेल तर कोणत्या गोलंदाजाला डच्चू द्यायचा, हा संघ व्यवस्थापनापुढे यक्षप्रश्न असेल. कारण मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांनी दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये अचूक गोलंदाजी केली आहे. इशांत शर्मानेही दुसऱ्या कसोटी सामन्यात बळी मिळवले होते. त्यामुळे गोलंदाजांची निवड करताना संघ व्यवस्थापनाला विचार करणे भाग असेल.

आतापर्यंत कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आलेली नाही. मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल हे तिन्ही सलामीवीर अपयशी ठरले आहेत. चेतेश्वर पुजाराला अजूनही छाप पाडता आलेली नाही. हार्दिक पंडय़ाच्या फलंदाजीमध्ये सातत्य नाही. कोहलीने एक शतक झळकावले असले तरी अन्य डावांमध्ये त्याच्याकडून फारशी चांगली फलंदाजी पाहायला मिळालेली नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ निवडताना व्यवस्थापनाची सत्त्वपरीक्षा असेल.