वर्षभराने लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या नवीन तारखांसाठी सर्व पर्याय खुले आहेत, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) प्रमुख थॉमस बाख यांनी स्पष्ट केले. करोनामुळे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षांने पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र पुढील वर्षी नेमक्या कोणत्या तारखेला ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात येईल, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

‘‘अजून नवीन तारखा आम्ही ठरवलेल्या नाहीत. मात्र अनेक पर्याय खुले आहेत. जुलै-ऑगस्ट या महिन्यांमध्येच ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, असे आताच सांगता येणार नाही,’’ असे बाख यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षी ६ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धादेखील अमेरिकेतील युगेन, ऑरेगॉन येथे रंगणार आहे. मात्र ऑलिम्पिकचे आयोजन केल्यास जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. १६ जुलै ते १ ऑगस्ट या दरम्यान जागतिक जलतरण स्पर्धादेखील जपानमधील फ्युक्युका येथे होणार आहे. मात्र आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाकडूनही ऑलिम्पिकसाठी स्पर्धेचे वेळापत्रक बदलण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.