चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा आणि जर्मनीची अँजेलिक कर्बर यांनी सोमवारी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत विजयी सलामी नोंदवली.

लुइस आर्मस्ट्राँग स्टेडियमवर झालेल्या महिला एकेरीच्या लढतीत १७व्या मानांकित कर्बरने क्रोएशियाच्या ऐला टॉमइजानोव्हिचवर ६-४, ६-४ असा विजय मिळवला. एक तास आणि २८ मिनिटांपर्यंत हा सामना लांबला. अग्रमानांकित प्लिस्कोव्हाने अलेलिया कॅलिनियाचा ६-४, ६-० असा धुव्वा उडवला. याव्यतिरिक्त, फ्रान्सच्या ३०व्या मानांकित क्रिस्टिना म्लॅडेनव्हिचने हॅली बॅपटिस्टीचा ७-५, ६-२ असा पराभव केला, तर व्हेवेरा ग्रेचेव्हाने पॉला बडोसाला ६-४, ७-५ असे नमवले.

कोर्ट नंबर पाचवर झालेल्या पुरुष एकेरीच्या लढतीत अर्जेटिनाच्या जुआन लेंडोरोने इवान डोन्स्कीवर ६-३, ६-३, ७-५ असे वर्चस्व मिळवले. हा सामना एक तास आणि ५२ मिनिटे रंगला.

पहिल्या फेरीतील सामने

*  वेळ : रात्री ८ वाजल्यापासून

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, २

भारताच्या सुमितचा आज सामना

पुरुष एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव खेळाडू सुमित नागल मंगळवारी त्याच्या अभियानास प्रारंभ करणार आहे. २३ वर्षीय सुमितपुढे अमेरिकेच्या ब्रॅडली क्लॅनचे आव्हान असणार आहे. अनेक नामांकित खेळाडूंनी माघार घेतल्याने सुमितला सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. सुमितव्यतिरिक्त पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा आणि दिविज शरण हे भारतीय खेळाडूसुद्धा आपापल्या सहकाऱ्यासह खेळताना आढळतील.