आठवडय़ाची मुलाखत ; अमित पागनीस, मुंबई संघाचा मुख्य प्रशिक्षक

प्रशांत केणी,  लोकसत्ता

मुंबई : ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. यात दुय्यम संघसुद्धा धक्कादायक कामगिरी करू शकतो, असे मत मुंबई संघाचा नवनिर्वाचित प्रशिक्षक अमित पागनीसने व्यक्त केले.

* मुंबईच्या क्रिकेट संघाचे महत्त्वाचे अनुक्रमे मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीचे प्रमुख हे तुम्हाला लाभले आहे, या जबाबदारीकडे कशा रीतीने पाहता?

देशांतर्गत क्रिकेटमधील मातब्बर संघांमध्ये गणना केल्या जाणाऱ्या मुंबईच्या प्रशिक्षकपदाची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. संघाची तयारी करण्यासाठी माझ्याकडे वेळ कमी असला तरी ती मोठी समस्या नाही. मी दोन वष्रे २३ वर्षांखालील मुंबई संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते, तसेच गतवर्षी शरद पवार अकादमीत फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून कार्यरत होतो. त्यामुळे मुंबईच्या संघाची पुरेशी जाण आहे. मागील दोन हंगामांत प्रभावी कामगिरी न करू शकणाऱ्या मुंबईची कामगिरी यंदा उत्तम होईल, याची मला खात्री आहे.

* सर्वात पहिले आव्हान तुमच्यापुढे सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचे आहे, याकडे तुम्ही कसे पाहता?

गतवर्षी मुश्ताक अली स्पध्रेत मुंबईने गटविजेत्याच्या थाटात अव्वल साखळी गाठली. अव्वल साखळीनंतर उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. म्हणजेच कामगिरी खराब झाली असे म्हणता येणार नाही. मुंबईचे अनेक खेळाडू ‘आयपीएल’मध्ये खेळले आहेत. त्यामुळे क्रिकेटशी संपर्कात असल्याचा फायदा होईल.

* मुंबईला घरच्या मैदानावर साखळी सामने खेळता येणार आहेत, याविषयी काय सांगाल?

घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ मुंबईच्या संघाला नक्कीच होईल, परंतु ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये वातावरण, खेळपट्टी हे मुद्दे कमी महत्त्वाचे ठरतात.

* आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही जैव-सुरक्षित वातावरणाचे आव्हान क्रिकेटपटूंपुढे असेल, याविषयी तुमचे मत काय आहे?

कोणताही खेळ खेळताना खेळाडूंच्या सुरक्षेचे आव्हान महत्त्वाचे असते. जैव-सुरक्षेचे कवच नसेल, तर खेळाडूंना त्याचा त्रास होईल. करोनाच्या या आव्हानाशी मुकाबला करताना व्यावसायिक क्रिकेटपटूला जैव-सुरक्षेच्या वातावरणाशी एकरूप होण्याची नितांत आवश्यकता आहे.