कबड्डी आणि फूटबॉलमागोमाग अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांनी आता क्रिकेटमध्ये रस घेतला आहे. आयपीएलमधल्या संघात गुंतवणूक करण्यास बच्चन यांच्या मालकिच्या एबी कॉर्पने स्वारस्य दाखवले असून त्यांनी चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स या संघांशी प्राथमिक स्तरावर बोलणी केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

इंडियन सुपर लीग व प्रो कबड्डीमध्ये बच्चन यांचे संघ असून आता कदाचित आयपीएलच्या झगमगीत विश्वातही बच्चन पिता-पूत्र दिसण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चन कॉर्पोरेशनचे सीईओ रमेश पुलापका यांनी राजस्थान रॉयल्सचे सह-मालक मनोज बडाले यांची अभिषेकनं लंडनमध्ये भेट घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चेन्नई सुपरकिंग्जसोबतची बोलणी फळली नसल्याचे वृत्त असून कदाचित राजस्थान रॉयल संघाचे मालक म्हणून बच्चन कुटुंब दिसण्याची शक्यता आहे.

राजस्थान रॉयल्समधून शिल्पा शेट्टी राज कुंद्रा बाहेर पडल्यानंतर या संघाच्या मागे सेलीब्रिटी नसल्याचे चित्र आहे. मनोज बडाले सध्या एकमेव संघमालक असून ते दुसऱ्या जोडीदाराची गुंतवणूक स्वीकारण्यास उत्सुक असल्याचे वृत्त आहे. या गुंतवणुकीसाठी अनेक गुंतवणूकदार उत्सुक असले तरी बच्चन यांच्या रुपानं सेलीब्रिटी लाभणार असल्यानं त्यांचं पारडं जड असल्याचं चित्र आहे.

आयपीएल संघामध्ये थोडीफार गुंतवणूक करावी आणि त्या संघाला ब्रँड व्हॅल्यू मिळवून देतानाच स्वत:च्या जाहिरातींच्या व्यवसायाचं गणितही जमवावं असा हेतू अमिताभ बच्चन कॉर्पोरेशनचा यामागे असून शकतो. ही सगळी गणितं जुळून आली तर आयपीएलच्या येत्या हंगामात अभिषेक, अमिताभ व ऐश्वर्या राय राजस्थान रॉयल्सच्या संघाला चीअर्स करताना स्टेडियममध्ये दिसण्याची शक्यता आहे.