भारतीयांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेल्या क्रिकेटचा विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विश्वचषकातील पहिल्याच लढतीत भारतीय संघ कट्टर हाडवैरी असलेल्या पाकिस्तानशी सामना करणार आहे. तमाम क्रिकेटप्रेमींच्यादृष्टीने विशेष असलेल्या या लढतीला आणखी एका गोष्टीमुळे चार चाँद लागणार आहेत. भारदस्त आवाजाची दैवी देणगी असणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक दस्तरखुद्द अमिताभ बच्चन या सामन्यासाठी समालोचन करणार आहेत. अमिताभ यांच्या आगामी ‘शमिताभ’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीचा भाग म्हणून चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्टार स्पोर्टस वाहिनीच्या साह्याने हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी हा सामना खेळवण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन हे कपिल देव आणि शोएब अख्तर या माजी खेळांडूसह समालोचकांच्या बॉक्समध्ये दिसणार आहेत. तिरंगी मालिकेतील इंग्लंड- ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी झालेल्या अंतिम सामन्यादरम्यान ही घोषणा करण्यात आली.
चित्रपटाच्या टीमच्या माहितीनुसार, “भारत-पाकिस्तान सामन्याची लोकप्रियता पाहता, प्रमोशन करण्याची ही चांगली संधी आहे.” या अनोख्या प्रमोशनमुळे अमिताभ बच्चनही खुश आहेत. याबद्दल बोलताना अमिताभ यांनी भारतामध्ये लोकांवर क्रिकेट आणि चित्रपट या दोन गोष्टींचा प्रचंड प्रभाव असल्याचे म्हटले. त्यामुळे मी दोन्ही पातळ्यांवर प्रचंड उत्सुक आहे. एकीकडे येत्या ६ फेब्रुवारीला माझा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि भारत-पाक यांच्यातील सामन्यात मला समालोचनाची संधी मिळण्याचा दुहेरी योग यानिमत्ताने चालून आल्याचेही त्यांनी सांगितले.