भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याला ताल स्मृतिचषक बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्याच डावात इटलीच्या फॅबिआनो कारुआना याने पराभवाचा धक्का दिला. या स्पर्धेतील पहिल्या फेरीत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने झकास प्रारंभ केला. त्याने पारंपरिक प्रतिस्पर्धी व्लादिमीर क्रामनिक याच्यावर सहज विजय मिळविला. दहा खेळाडूंच्या या स्पर्धेतील सामने अव्वल साखळी पद्धतीने होणार आहेत. कार्लसन व कारुआना यांच्याबरोबरच शाख्रीयर मामेद्यायेव्ह (अझरबैजान) यानेही विजय मिळविला. त्याने हिकारू नाकामुरा (अमेरिका) याच्यावर मात केली. इस्रायलच्या बोरिस गेल्फंड याने रशियाच्या सर्जी कर्जाकिन याला बरोबरीत रोखले. रशियाच्या दिमित्री आंद्रेकिन याने आपलाच सहकारी अ‍ॅलेक्झांडर मोरोजेवीच याच्याविरुद्धचा डाव बरोबरीत ठेवला. या स्पर्धेतील आठ फेऱ्या अद्याप बाकी आहेत. आनंद, क्रामनिक व नाकामुरा यांना एकही गुण मिळाला नाही.
पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळण्याचा फायदा आनंदला घेता आला नाही. त्याने रॉय लोपेझ तंत्राचा उपयोग केला. डावाच्या सुरुवातीला आनंदने दोन प्यादे गमावली. त्यामुळे त्याची बाजू कमकुवत झाली. त्याचा फायदा घेत कारुआना याने आनंदविरुद्ध पहिला विजय मिळविला.