सिद्धार्थ खांडेकर – response.lokprabha@expressindia.com

मुलुखमैदान
बुद्धिबळाच्या बाबतीत भारताचे भविष्यातील चित्र आशादायी आहे. याचे कारण या खेळाच्या क्षेत्रातली नवीन फळी. ही  नवीन मुले अगदी लहान वयातच गॅ्रण्डमास्टर होऊ लागली आहेत. त्यातून भविष्यात आनंदसारखे जगज्जेते निर्माण होतील, यात शंका नाही.

परवा एक गंमत झाली. भारताचा सवरेत्कृष्ट बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने त्याच्या चेन्नईतल्या घरी दोन खास पाहुण्यांना दिवसभरासाठी आमंत्रित केले होते. हे दोघेही उदयोन्मुख बुद्धिबळपटू आहेत. त्यांतील एकाचे नाव प्रज्ञानंद. दुसऱ्याचे नाव गुकेश. फारच थोडय़ा बुद्धिबळपटूंना साक्षात आनंदच्या आमंत्रणाचा लाभ अशा प्रकारे झाला असेल. विश्वनाथन आनंद भारताचा पहिला ग्रॅण्डमास्टर. साधारण तिसेक वर्षांपूर्वी (खरे तर ३२ वर्षांपूर्वी म्हणजे १९८७ मध्ये) तो एकाच वेळी ज्युनियर जगज्जेता आणि ग्रॅण्डमास्टर झाला. या सहस्रकाच्या सुरुवातीला म्हणजे २००२ मध्ये आनंद पहिल्यांदा वरिष्ठ जगज्जेता बनला. मग २००७, २००८, २०१० आणि २०१२मध्ये त्याने हाच मान पटकावला. या वर्षी डिसेंबरमध्ये आनंद ५० वर्षांचा होईल. ३२ वर्षांमध्ये भारतातील बुद्धिबळ ग्रॅण्डमास्टरांची संख्या वाढत गेलेली दिसून येते. सन २०००पर्यंत आनंद धरून भारताकडे पाच ग्रॅण्डमास्टर होते. २०१०मध्ये ही संख्या २३ वर गेली. या दशकात आठ वर्षांमध्ये भारतात आणखी २७ बुद्धिबळपटू ग्रॅण्डमास्टर बनले. म्हणजे नव्वदच्या दशकात चार, २०००च्या दशकात १८ आणि चालू दशकात आतापर्यंत २७ असा हा वाढता ‘स्ट्राइक-रेट’ आहे. या वाटचालीचे स्फूर्तिस्थान अर्थातच आनंद आहे. अजूनही आनंद जगात पहिल्या दहामध्ये असून जगज्जेता नसला, तरी त्याच्यापेक्षा अध्र्या वयाच्या ग्रॅण्डमास्टरांबरोबर खेळतो आहे. हे करत असताना २०१७ मध्ये तो जलद किंवा रॅपिड प्रकारात जगज्जेता बनला होता. गेल्या वर्षांच्या अखेरीस टाटा स्टील स्पर्धेत त्याने अतिजलद किंवा ब्लिट्झ प्रकारात अजिंक्यपद पटकावले होते. त्याच्या बरोबरीचे अनेक ग्रॅण्डमास्टर मागे पडले आहेत. काही जण केवळ हौस म्हणून खेळतात किंवा प्रशिक्षक झाले आहेत. व्लादिमीर क्रॅमनिकसारखा माजी जगज्जेता, आनंदचा प्रतिस्पर्धी आणि मित्र पूर्वीसारखे खेळता येत नाही म्हणून निवृत्त झाला. आनंद मात्र अजूनही उमेदीने, उत्साहाने खेळतो आहे आणि त्याची ऊर्जा गुकेश, प्रज्ञानंदसारख्या शाळकरी मुलांमध्ये झिरपते आहे. त्यातून भविष्यात आनंदसारखे जगज्जेते निर्माण होतील, यात शंका नाही.

कित्येकजण आनंदसारखे ग्रॅण्डमास्टर झाले, पण एकही भारतीय आनंदनंतर त्याच्यासारखा जगज्जेता होऊ शकला नाही, हे वास्तव आहे. याचे एक कारण म्हणजे, जगज्जेतेपद हे कोण्या एका देशाची मिरासदारी राहिलेली नाही. गेल्या शतकात बॉबी फिशर (अमेरिका), मॅक्स युवे (हॉलंड), होजे राऊल कॅपाब्लांका (क्युबा), इमान्युएल लास्कर (जर्मनी) असे सन्माननीय अपवाद वगळता उर्वरित जगज्जेते सोव्हिएत महासंघातील आणि रशियातील होते. ती परिस्थिती पूर्णतया पालटलेली आहे. गॅरी कास्पारॉव्ह या रशियन जगज्जेत्याला २००१मध्ये व्लादिमीर क्रॅमनिक या रशियाच्याच ग्रॅण्डमास्टरने हरवले. या क्रॅमनिकला २००८मध्ये आनंदने हरवले. विद्यमान जगज्जेता मॅग्नस कार्लसन हा नॉर्वेचा आहे. थोडक्यात, एकाच देशातून पाठोपाठ जगज्जेते निर्माण होणे जवळपास थांबलेले आहे. आनंदपाठोपाठ पेंटाल्या हरिकृष्ण आणि विदिथ गुजराती हे २७०० एलो गुणांच्या वरचे मानांकन असलेले बुद्धिबळपटू आहेत. त्यांना आनंदचा वारसदार होण्याची संधी सध्या तरी सर्वाधिक आहे. याशिवाय अधिबान भास्करन आणि कृष्णन शशीकिरण हेही अव्वल खेळाडूंसमवेत खेळत असतात. परिमार्जन नेगी या दिल्लीकर मुलाने लहान वयातच बरीच मजल मारली. त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण ऐन भरात असताना परिमार्जनने परदेशात उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात देशात अनेक चांगले ग्रॅण्डमास्टर निर्माण होत होते. पण शशीकिरणचा अपवाद वगळता इतरांना २७०० एलो गुणांवर जाता आले नाही. या सगळ्यांच्या तुलनेत हरिकृष्ण आणि विदिथ हे दीर्घकाळ पहिल्या पन्नासात असल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. पण भारताचे भविष्य वर्तमानापेक्षा आशादायी दिसते. याचे कारण या खेळाच्या क्षेत्रातली नवीन फळी. ही  नवीन मुले अगदी लहान वयातच गॅ्रण्डमास्टर होऊ लागली आहेत. त्यातून भविष्यात आनंदसारखे जगज्जेते निर्माण होतील, यात शंका नाही.  गेल्या वर्षी गॅ्रण्डमास्टर झालेला प्रज्ञानंद आज मोठय़ा स्पर्धामध्ये खेळतोय. परवाच जगातला दुसऱ्या क्रमांकाचा युवा गॅ्रण्डमास्टर झालेल्या गुकेशला बडय़ा स्पर्धाची आमंत्रणे येऊ लागली आहेत. ‘चेसबेस इंडिया’ या भारतीय बुद्धिबळाला वाहिलेल्या वेबसाइटने काही दिवसांपूर्वी एक मजेशीर आकडेवारी सादर केली. २००६ मध्ये जन्माला आलेल्या १६ अव्वल बुद्धिबळपटूंपैकी गुकेशसह नऊ भारतीय आहेत! आजवर प्रज्ञानंद, गुकेश किंवा निहाल सरीन ही नावेच ठाऊक होती. पण त्यांच्याबरोबरीने एम. श्रीश्वन, आदित्य मित्तल, लेऑन मेंडोन्सा, एम. प्रणेश, प्रणव आनंद यांच्यावरही लक्ष ठेवावे लागेल. श्रीश्वन, आदित्य मित्तल हे गॅ्रण्डमास्टर होण्याच्या वाटेवर आहेत. श्रीश्वनने गेल्या वर्षी युक्रेनच्या व्ॉसिली इव्हानचुकसारख्या मातब्बर बुद्धिबळपटूला हरवले होते.

भविष्यात मातब्बर बुद्धिबळपटूंच्या लढाईमध्ये भारत आणि चीन हे दोन देश प्रामुख्याने दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. आज महिला जगज्जेत्या चीनच्या असतात. पुरुषांमध्येही त्यांनी गेल्या वर्षी सांघिक अजिंक्यपद पटकावले. २७०० एलो गुणांच्या वर मानांकन असलेले चीनचे सात गॅ्रण्डमास्टर आहेत. डिंग लिरेन हा त्यांचा अव्वल गॅ्रण्डमास्टर सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने इतर मोजक्याच बुद्धिबळपटूंना साधले असे २८०० गुणांचे एलो मानांकनही गाठून दाखवलेले आहे. वेई ली आणि यू यांग्यीसारखे युवा गॅ्रण्डमास्टर ज्युनियर गटात कित्येक काळ अव्वल स्थानावर होते. इतर अनेक खेळांप्रमाणेच बुद्धिबळातही चांगली कामगिरी करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रमच जणू चीनने हाती घेतला आहे. याअंतर्गत हल्ली चीनमध्ये अनेक अव्वल बुद्धिबळ स्पर्धाही होत असतात. पण असे असूनही ज्या वेगात भारतातील मुले गॅ्रण्डमास्टर होत आहेत तो वेग चीनला साधता आलेला नाही. कदाचित त्यांचे प्राधान्य वेगळे असेल. भारतात विशेषत चेन्नईमध्ये आर. बी. रमेश या गॅ्रण्डमास्टर आणि सध्या एक उत्तम प्रशिक्षक असलेल्या बुद्धिबळपटूच्या ‘गुरुकुल’मध्ये अतिशय गुणवान बुद्धिबळपटू उदयाला येत आहेत. प्रज्ञानंद हे अर्थातच सर्वाधिक गाजलेले नाव. गेल्या वर्षी तो गॅ्रण्डमास्टर झाला. जगातील सर्वात युवा गॅ्रण्डमास्टर ठरण्याची त्याची संधी थोडक्यात हुकली. पण आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात लहान खेळाडू हा मान मात्र (गॅ्रण्डमास्टर बनण्यापूर्वी) त्याच्याच नावावर होता. एका स्पर्धेत तो उत्तम खेळत होता, त्यावेळी ‘ज्याचे नावही उच्चारता येत नाही अशा’ या बुद्धिबळपटूची दखल अनेकांनी घेतली होती. प्रज्ञानंदला नंतर भारतातल्या टाटा स्टील स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. कोलकात्यात झालेली ती स्पर्धा रॅपिड आणि ब्लिट्झ प्रकारातली होती. याशिवाय नवीन वर्षांत हॉलंडमधील विक आन झे शहरात टाटा स्टील याच नावाने आणखी एका स्पर्धेत (पारंपरिक किंवा क्लासिकल प्रकारातली स्पर्धा) अव्वल गटात जिथे मॅग्नस कार्लसन, विश्वनाथन आनंद, व्लादिमीर क्रॅमनिक खेळत होते, तिथे दुय्यम गटात खेळण्याची संधी प्रज्ञानंदला मिळाली. तो अत्यंत आत्मविश्वासाने बुद्धिबळ पटावर बसलेला असतो. तो १२ वर्षांचा शाळकरी मुलगा असल्यामुळे तमीळशिवाय इतर भाषा तो सफाईने बोलू शकत नाही. पण त्याचा त्याला कोणत्याही प्रकारचा गंड नाही. एकदा चाली रचू लागल्यावर बाकीच्या भाषेची गरजच उरत नाही. तो प्रचंड मेहनत घेतो आणि तरीही थकत नाही, असे त्याचा प्रशिक्षक आर. बी. रमेश सांगतो. प्रज्ञानंद अत्यंत आक्रमक आहे आणि अनेकदा निकालांची पर्वा न करता प्रतिस्पध्र्यावर तुटून पडतो. कालपरत्वे त्याला आपल्या खेळात बदल करावा लागेल, कारण निव्वळ आक्रमणाइतकाच बचाव देखील बुद्धिबळात अत्यंत महत्त्वाचा आणि कित्येकदा निर्णायक ठरतो. प्रज्ञानंद ग्रॅण्डमास्टर होत होता, त्या काळात आनंदही ट्विटरच्या माध्यमातून त्याचा हुरूप वाढवत होता. पण त्याच्यावर दडपण येईल, असे कोणतेही ट्वीट आनंदने लक्षपूर्वक टाळले. प्रज्ञानंद ग्रॅण्डमास्टर झाल्यानंतर आनंदचा सल्ला होता – वेलकम टू द क्लब. आकडय़ांकडे आता फार लक्ष देऊ नकोस! बुद्धिबळाचा पट-सोंगटय़ा आणि लॅपटॉप घेऊन प्रज्ञानंद सतत काहीतरी नवीन शोधत असतो. त्याच्या बरोबर उलट ठरतो गुकेश. तो सहसा लॅपटॉप वापरतच नाही. सध्याच्या काळात हे मोठे धाडसच. कारण बुद्धिबळात प्रगती करण्यासाठी शक्तिशाली सॉफ्टवेअर विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी वापरणे, प्रतिस्पध्र्याचे डाव पाहण्यासाठी डेटाबेसचा वापर करणे हे अत्यावश्यक बनले आहे. गुकेश मात्र पारंपरिक पद्धतीने पटावर सोंगटय़ा मांडून बुद्धिबळाचा अभ्यास करतो. या भांडवलावर तो ग्रॅण्डमास्टर झाला यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही. गुकेशच्या या शैलीने आनंदही प्रभावित झाला. मात्र भविष्यात सॉफ्टवेअरचा, डेटाबेसचा वापर करावाच लागेल, असा सल्लाही आनंदने त्याला दिला. या दोघांच्या बरोबरीने ज्याचे नाव घेतले जाते, तो निहाल सरीन हा केरळचा. त्याला चेन्नई किंवा गुरुकुलचा लाभ मिळाला नाही. याउलट त्याला घडवण्यासाठी त्याचा प्रशिक्षक ई. निर्मल याने अभिनव मार्ग पत्करला. त्याने निहालला इंटरनेटवर खेळायला लावले. इंटरनेटवर खेळून निहालच्या खेळात विलक्षण सुधारणा झाली. सहाव्या वर्षांपर्यंत निहालला बुद्धिबळाचा गंधही नव्हता, पण १४व्या वर्षांपर्यंत तो ग्रॅण्डमास्टर झाला यात निर्मल याच्या अभिनव प्रशिक्षणाचा मोठा वाटा होता. निहाल सरीनलाही कोलकाता टाटा स्टील स्पर्धेत आनंद, हिकारू नाकामुरासारख्या मातब्बरांशी दोन हात करण्याची संधी मिळाली.

भविष्यात या तीन बुद्धिबळपटूंकडून मोठी अपेक्षा आहे. तिघेही जवळपास एकाच वयाचे असल्यामुळे त्यांना एकमेकांशीही स्पर्धा करावी लागेल. त्यांच्या जोडीला इतरही गुणवान बुद्धिबळपटू भारतात तयार झाले असतील, असे सध्याचे आशादायी चित्र आहे. हा सगळा निसंशय ‘आनंद इफेक्ट’ आहे. फरक इतकाच, की यामुळे भविष्यात केवळ ग्रॅण्डमास्टरच नव्हे, तर आनंदप्रमाणे आणखी भारतीय जगज्जेतेही पाहायला मिळतील.
सौजन्य – लोकप्रभा