आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणात अडकलेल्या अंकित चव्हाणने बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला आपल्यावरील बंदीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. २०१३ आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणात अंकित चव्हाण, अजित चंदेला आणि एस.श्रीशांत यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. यानंतर बीसीसीआयने तिन्ही खेळाडूंवर आजन्म बंदी घातली होती. दिल्ली उच्च न्यायालयाकडून २०१५ मध्ये खेळाडूंना क्लिन चीट मिळाल्यानंतर श्रीशांतने आपल्यावर टाकण्यात आलेल्या बंदीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने श्रीशांतवरील बंदी उठवत बीसीसीआयला त्याला खेळण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. यानंतर बीसीसीआयने २०२० रोजी श्रीशांतला स्थानिक क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली.
“माझ्यावरील बंदी उठवण्याबाबत पुनर्विचार केला जावा अशी विनंती मी बीसीसीाय आणि एमसीएला केली आहे. मला पुन्हा क्रिकेट खेळायचं आहे. मला पुन्हा मैदानावर उतरायचं आहे. श्रीशांतने आपली बाजू योग्य पद्धतीने मांडली, त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळतेय. त्यामुळे माझ्यावर टाकण्यात आलेल्या बंदीचाही पुनर्विचार व्हावा असं मला वाटतं. मी एमसीएला माझं म्हणणं सांगितलं असून ते माझी बाजू बीसीसीआयकडे मांडतील.” अंकित चव्हाण इंडियन एक्स्प्रेसशी बोलत होता.
२०१५ साली मला क्लिन चीट मिळाली, पण माझ्यावरील बंदी अजून कायम आहे. माझं आयुष्य हे क्रिकेटशिवाय अपूर्ण आहे, मला पुन्हा मैदानावर खेळायचं आहे यासाठी मी माझी बाजू मांडली आहे. सध्या या विषयावर अधिक बोलणं योग्य ठरणार नाही, माझ्या विनंतीवर अधिकारी काय निर्णय घेतात हे पहावं लागेल, ३४ वर्षीय फिरकीपटू अंकितने आपली बाजू मांडली. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय नाईक यांनी, अंकित चव्हाणचा इ-मेल मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. Apex Council च्या बैठकीत यावर चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असं नाईक यांनी स्पष्ट केलं.
अवश्य वाचा – आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर ! बीसीसीआय अधिकाऱ्याची माहिती