आंतरराष्ट्रीय स्तरावर एकेरी प्रकारात भारतीय बॅडमिंटनपटूंनी दमदार भरारी घेतली आहे. दुहेरीलाही प्राधान्य मिळाल्यास, दुहेरीतही भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करून दाखवतील असे मत माजी बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट यांनी व्यक्त केले. अहमबाद येथे सुरू असलेल्या भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाच्या वार्षिक अधिवेशनात बॅडमिंटनवर आयोजित परिसंवादात त्या बोलत होत्या. अपर्णा यांच्यासह या परिसंवादात राष्ट्रीय विजेता अनुप श्रीधर तसेच माजी खेळाडू आणि प्रशिक्षक निखिल कानेटकर उपस्थित होते.
‘गेल्या पाच ते सहा वर्षांत एकेरी प्रकारात अक्षरश: क्रांती झाली आहे. सायना, सिंधू, श्रीकांत यांनी भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. दुहेरीच्या खेळाडूंनाही संधी मिळाली तर यातही भारताचे नाव उज्ज्वल होऊ शकते. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने देदीप्यमान कामगिरी केली आहे. मात्र त्यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरावू शकेल अशी जोडी तयार होऊ शकलेली नाही. त्यासाठी पायाभूत स्तरापासून दुहेरीचा विचार व्हावा,’’ असे अपर्णा यांनी सांगितले.
‘‘खेळाच्या विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर लीग स्पर्धा असावी ज्यामध्ये एकेरी आणि दुहेरी दोन्ही प्रकारांचा समावेश असावा. खेळाडूंना मिळणारी बक्षीस रक्कम समाधानकारक असावी, जेणेकरून खेळाडू आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून याकडे वळू शकतील,’’ असे अनुपने सांगितले.