Article 370 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत काश्मीरच्या विषयावर निवेदन केले. त्यांनी जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याची शिफारस मांडली. केंद्र सरकारने संसदेत जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला. आतापर्यंत लडाख जम्मू-काश्मीरचा हिस्सा होता. पण प्रस्तावानुसार जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची तिथल्या जनतेची बऱ्याच काळापासून मागणी होती असे अमित शाह म्हणाले. अमित शाह यांची या प्रस्तावावर स्वाक्षरी आहे.

अमित शाह यांनी ही शिफारस मांडताच संसदेत मोठया प्रमाणावर गदारोळ झाला. विरोधकांनी अमित शाह बोलत असतानाच गोंधळ करण्यास सुरुवात केली आणि याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पण देशभरातून मात्र या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. अनेकांनी हा निर्णय योग्य असल्याचे सोशल मीडियावर म्हटले आहे. तर अनेकांनी याबाबत गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांचे अभिनंदन केले आहे.

या साऱ्या गोष्टींमध्ये इंग्लंडचा नवोदित गोलंदाज जोफ्रा आर्चर याचे नावही अचानक चर्चेत आले आहे. जोफ्रा आर्चरने खूप आधी एक ट्विट केले होते आणि त्या ट्विटचा संबंध ३७० शी लावण्यात आल्याचे ट्विटवर पाहायला मिळत आहे. सध्या त्याच्या एका ट्विटचा स्क्रिनशॉट व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये त्याने “सध्याच्या दिवसांमध्ये ३७० अजिबात सुरक्षित नाही”, असे ट्विट केलेले दिसत आहे.

हे ट्विट त्याने धावसंख्येचा दृष्टीने केले होते. पण नेटिझन्सने मात्र थेट याचा संबंध काश्मीरच्या कलम ३७० शी लावला असून आर्चरला भविष्य समजतं अशा आशयाचे ट्विट केले आहेत.

या आधी देखील जोफ्रा आर्चरचे अनेक जुने ट्विट विविध प्रकारे ताज्या घटनांशी जोडले गेले होते. काही दिवसांपूर्वी पृथ्वी शॉ याला डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने निलंबित केले होते. त्यावेळीही आर्चरने दुसऱ्या एका शॉ बद्दल लिहिलेल्या ट्विटचा संबंध पृथ्वी शॉ शी जोडण्यात आला होता.