डॉ. प्रकाश परांजपे

जाधव खेळायला येणार म्हणून छोटूने आज २-३ डाव पुस्तकांत बघून बोर्ड्समध्ये लावून ठेवले होते.  चित्रातला डाव टिम बुर्क यांच्या ‘द आर्ट ऑफ डिक्लेरर प्ले’ या पुस्तकातून  घेतला होता. कोलदांडा बोली ही  कल्पना छोटूला एकदम आवडली होती, त्यामुळे हा डाव त्याने निवडला होता.

भातखंडे यांनी छोटूच्या अपेक्षेप्रमाणे ३ बदाम ही कोलदांडा बोली केली. आजकालच्या प्रथेप्रमाणे ही बोली ७ पानी बदाम पंथ दाखविते आणि डावाची ताकद अगदी कमी, म्हणजे ८-९ चित्रगुणांपेक्षा कमीच हेही सांगते. उ-द जोडीकडे चांगला डाव होता. आबांकडे इस्पिकचा तगडा पंथ होता. त्याशिवाय चौकट पंथात पाच पानं होती. ३ बदाम बोलीवर आबांना ३ इस्पिक बोली लावता आली असती, पण ४ इस्पिकचा शतकी ठेका निभावण्याकरिता भिडूकडून थोडीफार मदत होईलच अशा अंदाजाने आबांनी थेट ४ इस्पिकची बोली केली. मेनन पास म्हणाला. जाधवकडे दोन एक्के , चौकटची राणी, आणि इस्पिक पंथाला ३ पानांची मदत एवढी संपत्ती होती. त्यामुळे त्यांनी सरळ ६ इस्पिकची बोली लावली.  इतर तिघांनी पास म्हटल्यावर ६ इस्पिक हा ठेका नक्की झाला.

मेननने बदाम राणीची उतारी केली. जाधवांनी आपली  पानं टेबलवर पसरली. आबा ती पानं बघून खूश झाले. भातखंडेने बदाम राणीला दस्त जिंकू देण्याऐवजी राजा खेळणं पसंत केलं. कुणी सांगावं, मेननकडे राणी एकुलती एकच असली तर? बदाम राजाने दस्त जिंकल्यानंतर त्याने बदाम एक्का वाजवायचा प्रयत्न केला; पण आबांनी काळजीपूर्वक इस्पिक एक्क्याने मारती घेतली आणि लगोलग दोन हुकूम – इस्पिक राजा-राणी, वाजवले.  हातात ६ आणि जाधवकडे ३ अशी मिळून ९ हुकमाची पानं ठेकेदारीत होती, म्हणजे गावात उरलेली ४. ती जर राजा-राणी वर २-२ अशी पडली असती तर आबांचं काम झालं असतं; पण दुसऱ्या हुकमावर मेननने एक किलवर जाळलं आणि आबांना विचार करणं भाग पडलं. भातखंडेकडे ७ बदाम आणि ३ इस्पिक अशी दहा पानं होती. चौकटचा एक्का आणि राणी खेळून मग एक चौकट बघ्याच्या हातातल्या इस्पिक दश्शीने मारून घ्यायचा आबांचा विचार होता, पण भातखंडेच्या हातात एक हुकूम उरल्यामुळे चौकटचा दुसरा दस्त निभावेल याची खात्री नव्हती, चौकट राणी हुकमाने कापली जाण्याची शक्यता होती, त्यामुळे आबांनी आपला विचार बदलला आणि सरळ सगळे हुकम वाजवायचा मार्ग पत्करला.

इस्पिक गुलामावर मेननने आणखीन एक किलवर जाळलं तर  पुढच्या इस्पिक सत्तीवर एक चौकट. आबांनी बघ्यातर्फे उरलेलं बदाम जाळलं. शेवटच्या इस्पिक छक्कीवर मात्र मेननची दांडी उडाली. किलवर जाळावं तर बघ्याच्या हातातली किलवरची पानं सर होणार ही भीती होती म्हणून मेननने आणखीन एक चौकट जाळलं; पण मेनन काय खेळतो याकडे आबांचं बारीक लक्ष होतं. शेवटचे सहा दस्त आबांनी चौकट एक्का-राणी, किलवर राजा आणि चौकट राजा-९-७ असे जिंकले आणि ६ इस्पिकचा ठेका यशस्वीपणे पूर्ण केला.

 (आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com