तुषार वैती

सध्या प्रत्येक जण आपली उत्तम शरीरसंपदा जपण्यासाठी तसेच तंदुरुस्ती राखण्यासाठी सजग होऊ  लागला आहे. त्यासाठी सकाळी उठून चालणे आणि धावणे याला अनेक जण पसंती देऊ लागले आहेत. गेल्या दीड-दोन दशकांपूर्वी हे चित्र फारच तुरळक असायचे. लोकांना तंदुरुस्तीसाठी जागरूक करण्यात मोलाचा वाटा आहे तो मॅरेथॉन शर्यतींचा. याचे मुख्य श्रेय मुंबई मॅरेथॉनला जाते. दीड दशकांपूर्वी मुंबई मॅरेथॉनची मुहूर्तमेढ रोवली गेली. हळूहळू या शर्यतीने लोकप्रियतेचे अनेक विक्रम नोंदवले. त्यामुळे देशभर बहुतेक ठिकाणी मुंबई मॅरेथॉनचे अनुकरण करत प्रमुख महानगरांमध्ये तसेच शहरांमध्ये मॅरेथॉन स्पर्धाचे जणू पीकच आले.

गेल्या २० वर्षांपूर्वी भारतात होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धा या हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्याच होत्या. मुंबई मॅरेथॉननंतर हे प्रमाण वाढत गेले. आजमितीस जवळपास दर आठवडय़ाला देशात कुठे ना कुठे किमान एक तरी मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे वर्षांचे वेळापत्रक पाहिले, तर नव्याने स्पर्धा आयोजित करण्यासाठी कुठेही वेळ मिळणार नाही. मॅरेथॉनची संख्या जसजशी वाढत गेली, तसतशी हौशी धावपटूंप्रमाणे अव्वल (एलिट) धावपटूंमध्येही वाढ होत गेली. पूर्वी मुंबईसह दिल्ली आणि कोलकाता मॅरेथॉन म्हणजे परदेशी खेळाडूंसाठी भरघोस बक्षिसे मिळवण्याची पर्वणीच असायची. आफ्रिकन खेळाडूंच्या वेगाशी स्पर्धा करणे भारतीय खेळाडूंसाठी अद्यापही शक्य नसल्यामुळे मॅरेथॉन शर्यतींवर आफ्रिकन खेळाडूंचेच वर्चस्व पाहायला मिळत आहे. पण भारतीय धावपटूही त्यांना कडवी टक्कर देऊ  लागले आहेत.

मॅरेथॉन शर्यतींमुळे देशाला अनेक चांगले धावपटू मिळाले आहेत. ललिता बाबर, कविता राऊत, सुधा सिंग, द्युती चंद, मोनिका आथरे, संजीवनी जाधव, ज्योती गवते, मोनिका आणि रोहिणी राऊत तसेच रामसिंग यादव, बिनिंग लिंगखोई, खेता राम, टी. गोपी, करण सिंग, नितेंद्र सिंग रावत ही त्यापैकीच काही नावे. २०१२, २०१३ आणि २०१४ अशी मुंबई मॅरेथॉन विजेतेपदांची हॅट्ट्रिक साधल्यानंतर ललिता बाबर स्टीपलचेस या अडथळा शर्यतीकडे वळली आणि २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिचे पदक थोडय़ा फरकाने हुकले. रामसिंग यादवनेही मुंबई मॅरेथॉनमध्येच ऑलिम्पिक पात्रतेचा निकष पार केला. कविता राऊत, सुधा सिंग, टी. गोपी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केले. सध्या हिमा दास, टिंटू लुका या छोटय़ा पल्ल्याच्या धावपटू देशाचे भवितव्य मानले जात आहेत. सध्या अव्वल धावपटूंच्या वैयक्तिक कामगिरीत सुधारणा झाली असून प्रत्येक जण आधीपेक्षा सर्वोत्तम वेळ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे सर्व मॅरेथॉन स्पर्धामुळेच शक्य झाले आहे.

भारतीय असोत अथवा परदेशी अ‍ॅथलेटिक्समध्ये कारकीर्द घडवणारे बहुतांशी खेळाडू हे गरीब घरांमधूनच येतात. आहार, स्पर्धासाठी लागणारे बूट यांचा खर्च पेलवणे हे या धावपटूंना सहज शक्य नसते. त्यातच एका मॅरेथॉननंतर दुसऱ्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी दीड-दोन महिन्यांची विश्रांती आवश्यक असल्यामुळे वर्षांतून पाच ते सहा मॅरेथॉन धावण्याची संधी खेळाडूंना मिळते. त्यामुळे या खेळात तग धरणे, ही तारेवरची कसरत असते. त्यामुळे ठिकठिकाणी होणाऱ्या छोटय़ा-मध्यम तसेच लांबपल्ल्याच्या मॅरेथॉन स्पर्धा या धावपटूंसाठी वरदान ठरू लागल्या आहेत. बक्षिसांच्या वाढत्या रकमेमुळे अनेक जण अ‍ॅथलेटिक्सकडे वळू लागले आहेत.

आजच्या घडीला देशातील अव्वल धावपटूंना, अ‍ॅथलीट्सना राष्ट्रीय सराव शिबिरात मिळणाऱ्या सोयीसुविधांमध्येही वाढ झाली आहे. मॅरेथॉन शर्यतींवर वर्चस्व गाजवणाऱ्या केनिया, इथिओपिया, युगांडा या आफ्रिकन देशांच्या तुलनेत भारतीय खेळाडूंना मिळणाऱ्या सोयीसुविधा अव्वल दर्जाच्या आहेत. मात्र आता आफ्रिकन खेळाडूंसारखीच कामगिरी भारतीय खेळाडूंकडून व्हावी, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. अनियमितता असणारी राष्ट्रीय सराव शिबिरेही आता नियमित होऊ  लागली आहेत. धावपटूंसाठी पोषक असणाऱ्या वातावरणात म्हणजेच उटी आणि बेंगळूरु अशा थंड हवेच्या ठिकाणी भारतीय खेळाडूंना सराव करण्याची संधी मिळू लागली आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ उत्तेजकांच्या बाबतीत अधिक कठोर झाला आहे. उत्तेजकांविषयी जनजागृती करून खेळाडूंना उत्तेजकांपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न होऊ  लागले आहेत.

मॅरेथॉन स्पर्धामुळे या खेळाला आणि धावपटूंना ‘अच्छे दिन’ आले असले तरी प्रेक्षकांची संख्या मात्र रोडावू लागली आहे, ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. मुंबई मॅरेथॉनचाच विचार केला तरी दरवर्षी सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत चालली आहे. पण या खेळाचा मुख्य कणा असलेला प्रेक्षकवर्ग मात्र दूर होऊ  लागला आहे. धावपटूंना प्रोत्साहन देणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत दरवर्षी घट होत चालली आहे. रविवारी मुंबईत मॅरेथॉन होणार, हे अनेकांना माहितीही नसेल. त्यामुळे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अन्यथा रविवारी सुट्टीच्या दिवशी वर्दळ नसलेल्या आणि रहिवासाचे ठिकाण नसलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ते चर्चगेट आणि दादपर्यंतच्या शर्यतमार्गात फक्त धावपटूंनाच धावावे लागेल.

tushar.vaity@expressindia.com