ऋषिकेश बामणे

अखेर करोना साथीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानाच्या भरपाईपोटी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केलेला इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३वा हंगामाच्या आयोजनाचा प्रयोग यशस्वीपणे उरकला. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आलेल्या यंदाच्या ‘आयपीएल’मधील अंतिम फेरीसह अनेक सामने निरस झाले. त्यामुळे आजपर्यंतच्या सर्वाधिक लांबलेल्या या ‘आयपीएल’ची ठरावीक प्रेक्षकवर्ग वगळता फारशी लाट दिसून आली नाही. जैव-सुरक्षित वातावरणाचे आव्हान, मातबरांचे अपयश, खेळाडूंच्या दुखापतीबाबत संभ्रम, सुपर-ओव्हपर्यंत रंगलेले सामने आणि नव्या ताऱ्यांचा उदय यांसारख्या नानाविध मुद्दय़ांनी मात्र थोडय़ा काळासाठी का होईना, चाहत्यांचे लक्ष करोनाकडून क्रिकेटकडे नक्कीच वळवले.

खेळाडूंपुढील असंख्य आव्हाने

यंदाच्या ‘आयपीएल’मधील खेळाडूंपुढे असलेल्या अनेक आव्हानांपैकी सर्वाधिक कठीण आव्हान म्हणजे जैव-सुरक्षिततेच्या नियमांचे पालन. बाहेरच्या विश्वापासून संपर्क तोडतानाच जवळपास ६० दिवस नियमांचे काटेकोर पालन करणे, करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेकडे लक्ष देणे. यामुळे खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक संतुलनावर प्रभाव दिसून आला. बेंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीसह दिल्लीचा श्रेयस अय्यर, चेन्नईचा महेंद्रसिंह धोनी या भारतीय खेळाडूंनीसुद्धा जैव-सुरक्षित वातावरणात राहताना कशा प्रकारे अडथळ्यांचा सामना करावा लागला, हे वेळोवेळी स्पष्ट केले. त्यातच एबी डीव्हिलियर्स, स्टीव्ह स्मिथ यांसारख्या विदेशी खेळाडूंनी आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बिग बॅश लीगदरम्यान पुन्हा जैव-सुरक्षित वातावरणात राहावे लागू नये, म्हणून आधीच माघार घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडू आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाले असून तेथेसुद्धा त्यांना या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. त्याशिवाय रोहित शर्माच्या तंदुरुस्तीबाबतही यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये अनेक चर्चा रंगल्या. एकीकडे दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आलेले असताना रोहित ‘आयपीएल’च्या बाद फेरीतील सामन्यांत खेळताना दिसला. मात्र अखेरीस त्याला कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान लाभल्याने त्याच्या तंदुरुस्तीचा विषय झाकोळला गेला.

सदोष पंचगिरीचा फटका

दिल्लीविरुद्धच्या पहिल्या साखळी लढतीत पंचांनी ख्रिस जॉर्डनने एक धाव अपूर्ण घेतल्याचा निर्णय दिल्यामुळे पंजाबला सुपर-ओव्हरमध्ये सामना गमवावा लागला आणि हीच एक धाव त्यांच्या बाद फेरीतील प्रवेशात अडथळा ठरली. त्याशिवाय यजुवेंद्र चहलने संजू सॅम्सनचा पकडलेला झेल, हैदराबादविरुद्ध धोनीच्या आक्रोशामुळे पंचांनी ‘वाइड’ न देण्याचा घेतलेला निर्णय आणि एलिमिनेटरमध्ये डेव्हिड वॉर्नरला बाद देण्याच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा पंच संपूर्ण हंगामादरम्यान चर्चेत राहिले.

कंटाळवाणा उत्तरार्ध

१९ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ‘आयपीएल’च्या सामन्यांनी जवळपास पहिले चार आठवडे चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले. शारजाच्या लहान मैदानावर होणारी चौकार-षटकारांची आतषबाजी आणि अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या सामन्यांनी रसिकांना टेलिव्हिजनसमोर खिळवून ठेवले. त्यातच रविवार, १८ ऑक्टोबरला झालेल्या तब्बल तीन सुपर-ओव्हरमुळे (मुंबई-पंजाब यांच्यातील दोन, तर कोलकाता-हैदराबाद यांच्यातील एक) चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला; परंतु त्यानंतर स्पर्धेच्या थरारनाटय़ाचा आलेख अचानक खालावल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. बाद फेरीचे गणित अखेरच्या साखळी लढतीपर्यंत स्पष्ट झालेले नव्हते. मात्र त्याप्रमाणे अपेक्षित चुरशीचे सामने क्वचितच झाले. अंतिम फेरीतसुद्धा संपूर्ण हंगामात जेतेपदाच्या प्रबळ दावेदाराप्रमाणे खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने नव्या दमाच्या दिल्ली कॅपिटल्सला सहज धूळ चारून पाचव्यांदा चषक उंचावला. त्यामुळे घरबसल्या सामन्यांचा आनंद लुटणाऱ्या प्रेक्षकसंख्येत वाढ झाली असली तरी स्पर्धेच्या उत्तरार्धात ‘आयपीएल’ छाप पाडण्यात अपयशी ठरले.

अनुभवी शिलेदारांपेक्षा युवक सरस

यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये भारतीय क्रिकेटला अनेक नवे तारे गवसले, तर काही जुन्या आणि अनुभवी खेळाडूंचा मात्र हा जवळपास शेवटचा हंगाम असल्याचे स्पष्ट झाले. उदयोन्मुख खेळाडूंचा विचार केल्यास बेंगळूरुचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल (४७३ धावा), पंजाबचा फिरकीपटू रवी बिश्नोई (१२ बळी), चेन्नईचे प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड (सलग तीन अर्धशतकांसह २०४ धावा) यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्याशिवाय मुंबईचा इशान किशन (५१६), सूर्यकुमार यादव (४८०), हैदराबादचा टी. नटराजन (१६ बळी), राजस्थानचा राहुल तेवतिया (२५५ धावा आणि १० बळी) यांनी संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण खेळ करताना भारतीय संघातील स्थानासाठी दावेदारी पेश केली. युवा खेळाडूंच्या जोरावर संघबांधणी करणारे मुंबई आणि दिल्ली या दोन संघांनीच अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेलीसुद्धा पाहायला मिळाले; परंतु त्याउलट अनुभवी खेळाडूंवर सातत्याने भरवसा दर्शवल्याचा फटका चेन्नई, राजस्थान, पंजाब आणि कोलकाता संघांना बसला. सुरेश रैना आणि हरभजन सिंगच्या माघारीमुळे हंगामाला प्रारंभ होण्यापूर्वीच चेन्नईला धक्का बसला. त्याशिवाय संघातील दोन खेळाडूंना झालेला करोना, कर्णधार धोनीची वाढत्या वयामुळे झालेली दमछाक, केदार जाधव, अंबाती रायुडू, शेन वॉटसन यांसारख्या अनुभवी खेळाडूंनी केलेल्या निराशेमुळे चेन्नईला प्रथमच बाद फेरी गाठण्यात अपयश आले. त्याशिवाय पंजाबचा ग्लेन मॅक्सवेल, कोलकाताचा दिनेश कार्तिक व आंद्रे रसेल, राजस्थानचा स्मिथ या खेळाडूंचे अपयश त्यांच्या संघांना महागात पडले.

rushikesh.bamne@expressindia.com