डॉ. प्रकाश परांजपे

संगणकाच्या मदतीने ‘डावाचा ‘ठेवा’ ’ (पार स्कोअर) सहज काढता येतो. वर दिलेल्या चित्रात पानांच्या खाली एका ओळीत हे संगणक-उत्तर छापलेलं आहे. पपूऐवजी पप आणि हुकमाच्या अक्षराऐवजी हुकमाचं चिन्ह वापरून छापलेलं हे उत्तर काय सांगतं?

कोण किती दस्त जिंकू शकणार, हे निवडलेल्या पंथावर अवलंबून असतं. पपू ३ बदाम म्हणजे प-पू जोडी ३ बदामचा ठेका निभावू शकेल, म्हणजे ६+३=९ दस्त जिंकू शकेल. ब्रिजमध्ये बोली करताना पहिले ६ दस्त हे गृहीत धरलेले असतात, हे आपण पूर्वी बघितलेलं आहेच, असं या उत्तराचा पहिला भाग आपल्याला सांगतो. याचप्रमाणे इस्पिक हुकूम असेल तर उ-द जोडी ८ दस्त जिंकू शकेल; किलवर हुकमात प-पू जोडी ९ दस्त जिंकू शकेल; चौकट हुकमात प-पू जोडी ७ दस्त बनवू शकेल; आणि ठेका बिनहुकमी असेल तर उ-द जोडी ७ दस्त बनवू शकेल असं संगणकाचं उत्तर आहे.

गमतीचा भाग म्हणून किंवा खेळाचा अभ्यास  म्हणून तुम्हीही चारी खेळाडूंची पानं मांडून संगणकाचं हे उत्तर तपासू शकता.  उदाहरणार्थ, इस्पिक हुकूम असेल तर उ-द जोडीला इस्पिकचे ६, चौकट एक्क्याचा १, आणि किलवर राणीचा एक असे ८ दस्त जिंकता येतील. संगणक उ-द २ इस्पिक या उत्तराद्वारे तेच दाखवतो आहे. अर्थातच किलवर राणीचा एक दस्त जिंकता येणं हा नशिबाचा भाग आहे कारण उत्तरेकडे असलेली किलवर राणी एक्का-राजाच्या डोक्यावर बसलेली आहे, बगलेत नाही.

पाची पंथांच्या अचूक खेळाचे गुण मोजून संगणक डावाचा ‘ठेवा’ सांगू शकतो. या डावात प-पू जोडी बदाम हुकमात खेळून ९ दस्त बनवू शकते, म्हणजे ३ बदामच्या सामान्य ठेक्यात ५० + तीस त्रिक ९० = १४० गुण मिळवू शकते. पण उ-द जोडी त्यांना सुखासुखी १४०चा गुण मिळू नये याचा प्रयत्न करणार. जर उ-द जोडी ३ इस्पिकच्या सामान्य ठेक्यात खेळली आणि त्यांनी ८ दस्त जिंकले  तर ठेक्यासाठी एक दस्त कमी पडला म्हणून ५० गुण प-पू जोडीला मिळेल. जर प-पू जोडीने ३ इस्पिकला डबल मारली तर त्यांना ५० ऐवजी १०० गुण मिळतील, पण तरीही ३ बदामाच्या ठेक्यात प-पू  जोडीला मिळणाऱ्या १४०पेक्षा आवक कमीच. अशा प्रकारे या डावात दोन्ही जोडय़ांनी आपल्या प्रयत्नांची शिकस्त करून आपल्याला जास्तीतजास्त चांगला असा निकाल मिळवला तर प-पू जोडीला  १०० गुण मिळतील.  म्हणूनच या डावाचा ‘ठेवा’ उ-द जोडीला ३ इस्पिक डबल या ठेक्यामध्ये वजा १०० गुण!  उ-द जोडीच्या भूमिकेतून हा आकडा मांडलेला आहे. वजा या चिन्हाचा अर्थ डावाचे गुण प-पू जोडीला.

डाव खेळताना खेळाडूंना हा ‘ठेवा’ शोधायचा असतो, जमल्यास प्रतिस्पर्ध्याच्या चुकीचा फायदा घेऊन त्याहून जास्त गुण मिळवायचा प्रयत्न करायचा असतो. खेळाडूंपेक्षाही समालोचकांना आणि प्रशिक्षकांना हा मुद्दा जास्त उपयोगी आहे.

ttps://www.youtube.com/channel/UCujcDs_XxoCivNNQANrtAwQ

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com