सुप्रिया दाबके

अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला करोना झाल्याचे समोर आल्यानंतर फक्त टेनिसजगतच नाही तर क्रीडाजगत हादरले. जोकोव्हिचने सर्बिया येथे आयोजित केलेल्या प्रदर्शनीय स्पर्धेत सुरक्षित अंतराचे कोणतेही पालन झाले नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे जोकोव्हिच, ग्रिगोर दिमित्रोव यांच्यासारख्या अव्वल खेळाडूंसह प्रशिक्षक गोरान इव्हानसेव्हिच यांना करोनाची लागण झाली. एकीकडे करोनाच्या संकटात गेल्या महिन्यात युरोपातील फुटबॉल लीग प्रेक्षकांशिवाय यशस्वीपणे सुरू झाल्या आहेत खऱ्या. बुधवारपासून (८ जुलै) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज ही क्रिकेटमधील कसोटी मालिका सुरू होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खेळ आणि खेळाडू सुरक्षित आहेत का, हा मुख्य प्रश्न आहे.

करोनाच्या संकटात तीन महिने क्रीडाविश्वदेखील पूर्णपणे ठप्प झाले होते. मात्र जर्मनीतील बुंडेसलिगा फुटबॉल स्पर्धा सर्वात प्रथम प्रेक्षकांशिवाय यशस्वीपणे सुरू झाली. आरोग्यविषयक संपूर्णपणे काळजी घेऊन ज्या प्रकारे बुंडेसलिगा सुरू करण्यात आली, त्याचे जगातून सर्वत्र कौतुक झाले. त्याच धर्तीवर स्पेनमध्ये ला-लिगा आणि इंग्लंडमध्ये इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल सुरू झाले. प्रेक्षकांशिवाय फुटबॉल स्पर्धा सुरू झालेल्या असताना जगप्रसिद्ध टेनिस खेळाचीही चर्चा सुरू होती. ३१ ऑगस्टपासून अमेरिकन खुली ग्रँडस्लॅम स्पर्धा आणि २७ सप्टेंबरपासून फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अमेरिकेतील करोनाची सध्याची स्थिती पाहता तेथे अमेरिकन खुली स्पर्धा नियोजित वेळेत होणार की नाही, हे अजून निश्चित झालेले नाही. मात्र फ्रेंच ग्रँडस्लॅम २७ सप्टेंबरपासून २० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरू करणार असल्याचे जाहीर करून क्रीडाजगतासाठी एक आश्वासक पाऊल टाकल्याचे दिसले आहे. पॅरिस येथे रंगणारी फ्रेंच ग्रँडस्लॅम दरवर्षी मे महिन्यात होते. वास्तविक जूनमध्ये होणारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा ज्याप्रमाणे रद्द झाली त्याप्रमाणे फ्रेंच ग्रँडस्लॅमही रद्द होऊ शकले असते. मात्र फ्रेंच ग्रँडस्लॅम सप्टेंबपर्यंत लांबणीवर टाकून फ्रेंच टेनिस महासंघाने आणि तेथील फ्रान्सच्या सरकारने खेळालाही तितकेच महत्त्व देत असल्याचे अधोरेखित केले आहे.

युरोपातील फुटबॉलमध्ये लीग सुरू झाल्या असल्या तरी खेळाडूंना प्रेक्षकांची उणीव भासत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. वास्तविक गोल केल्यानंतर कोणताही खेळाडू हा नेहमी प्रेक्षकांकडे धावत जाऊन हात उंचावत असतो. मात्र यंदा तेच पाठीराखे प्रेक्षक मैदानात नसल्याचे पदोपदी या फुटबॉलपटूंना जाणवत आहे. फुटबॉलच्या सामन्यांमध्ये निर्बंध असतानाही गोल केल्यानंतर खेळाडू आलिंगन देतात, हस्तांदोलन करतात. या सर्वावर करोनामुळे निर्बंध घालण्यात आले असले तरी मानवी भावना सर्वोच्च आहेत, हेदेखील या लढती पाहताना जाणवते. कारण खेळाडू हे गोल केल्यावर एकमेकांना आलिंगन देत आहेत. फुटबॉलच्या बाबतीत आणखी एक उदाहरण म्हणजे इटलीतील नापोली संघाने पटकावलेल्या विजेतेपदानंतर म्हणा किंवा लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमियर लीग जिंकल्यानंतर प्रेक्षकांचा संयम संपलेला दिसला. कारण नापोली म्हणा किंवा लिव्हरपूलच्या चाहत्यांनी रात्रभर त्यांच्या शहरांमध्ये एकत्र येत जल्लोष केला.

टेनिसच्या बाबतीत सांगायचे तर या खेळात सुरक्षित अंतर सहज राखले जाते. जोकोव्हिचने गेल्या महिन्यात सर्बिया आणि क्रोएशिया येथील निर्बंध करोनामुळे शिथिल झाल्यानंतर प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते. मात्र स्पर्धा झाल्यानंतर सहभागी सर्व मंडळींनी एकत्र मेजवानीसह जल्लोष केला. या सर्वाचा परिणाम म्हणजे एकामागून एक करोनाबाधित खेळाडू आढळले. या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतराचे निर्बंध असतानाही ते पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. आतादेखील युरोपात काही प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन प्रस्तावित आहे. मात्र प्रत्येक खेळाडूने स्वत:हून जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.

क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिके साठी वेस्ट इंडिजने अतिरिक्त राखीव खेळाडू दौऱ्यावर पाठवले आहेत. कारण जर एखादा खेळाडू करोनाबाधित आढळला तर ऐन वेळेस दौऱ्यावर खेळाडू कमी पडू नयेत म्हणून ही उपाययोजना आहे. पाकिस्तानचा क्रिकेट संघदेखील इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. सुरुवातीला पाकिस्तानचे १० खेळाडू करोनाबाधित आढळले होते. मात्र नंतर त्यापैकी काही जण करोनामुक्त झाले. या सर्व पार्श्वभूमीवर क्रिकेटदेखील करोनापासून कशा प्रकारे सुरक्षित खेळ सुरू करतो, हे पाहण्याची उत्सुकता आहे.

अमेरिकन स्पर्धेसाठी ठेवण्यात येणाऱ्या कठोर नियमांमुळे यंदा त्या स्पर्धेत खेळणार नसल्याचे जोकोव्हिच आणि राफेल नदाल यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. अमेरिकन स्पर्धेत खेळाडूंना स्वतंत्र विमानाने आणणे, सहभागी खेळाडूंना अमेरिकेत येताना त्यांचा नेहमीचा प्रशिक्षकांचा संघ आणण्यास मुभा नाही असे काही नियम आहेत. मात्र करोनाचे संकट अजून असताना आणि लसही सापडलेली नसताना खेळाडूंच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे.