क्रीडा संघटनांकडे सत्ताकेंद्र दृष्टीने न पाहता त्यांच्या व्यवस्थापनात व्यावसायिक दृष्टिकोन ठेवीत खेळाडू व खेळाचा विकास कसा होईल याकडे संघटकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.
केंद्रीय क्रीडा व युवक मंत्रालयातर्फे सर्व राज्यांच्या क्रीडा व युवकमंत्र्यांची परिषद येथे आयोजित करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन जेटली यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते पुढे म्हणाले की, ‘‘अनेक संघटक आपल्याकडेच संघटनेची सूत्रे कशी राहतील व संघटनेवर आपला वरचष्मा कसा राहील, असा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे खेळाचा अपेक्षेइतका विकास होत नाही.’’
‘‘केंद्रीय अंदाजपत्रकात गतवर्षीपेक्षा यंदा क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे क्रीडा संघटनांवर मोठी जबाबदारी आली आहे. देशातील क्रीडा क्षेत्राची प्रगती हेच लक्ष्य केंद्रस्थानी ठेवीत त्यानुसार क्रीडा संघटनांनी आपल्या कारभारात बदल करण्याची आवश्यकता आहे. जर संघटनांकडे निधी गोळा करण्याचे स्वत:चे स्वतंत्र स्रोत नसतील व त्यांना जर शासकीय निधीवर अवलंबून राहावे लागत असेल, तर त्यांनी कारभारात पारदर्शकता व प्रामाणिकपणा आणला पाहिजे,’’ असेही जेटली यांनी सांगितले.
जेटली पुढे म्हणाले की, ‘‘देशातील विविध खेळांची राष्ट्रीय सूत्रे संघटनांकडे असतात. त्यामुळे खेळाचा विकास करणे ही त्यांचीच संपूर्ण जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंच्या व्यवस्थापनाची जबाबदारी केंद्र शासन नेहमीच करीत असते. खेळाडू, संघटक व शासन यांच्यात चांगला समन्वय असेल, तर देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम प्रगती करता येते.’’