पाटा खेळपट्टीवर पहिल्या दिवशी फलंदाजी करताना मालिकेत आघाडीवर असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ धावांचा डोंगर उभारेल अशी आशा होती, पण ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर राहता न आल्याने त्यांना ३००  धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. सलामीवीर ख्रिस रॉजर्स, शेन वॉटसन आणि जॉर्ज बेली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ५ बाद २७३ अशी मजल मारली आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात झाली नाही. त्यांना पहिला धक्का ३४ धावांवर बसला, पण त्यानंतर रॉजर्स आणि वॉटसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचत संघाला सावरले. पण त्यानंतर रॉजर्स आणि वॉटसन संघाच्या १५५ धावा असताना बाद झाले व ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत सापडला. रॉजर्सने ११ चौकारांच्या जोरावर ७२ धावांची, तर वॉटसनने ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५१ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर बेलीने ४ चौकार आणि ३ षटकार लगावत ५३ धावांची खेळी साकारत संघाला सावरले, पण सामना संपायला काही मिनिटे शिल्लकअसताना ब्रॉडच्या गोलंदाजीवर स्वानने अप्रतिम झेल पकडत त्याला तंबूत धाडले. बेली बाद झाल्यावर मायकेल क्लार्कचा (नाबाद ४८) सोपा झेल कॅरबेरीने सोडला आणि इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पीछाडीवर ढकलण्याची संधी गमावली.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ९१ षटकांत ५ बाद २७३ (ख्रिस रॉजर्स ७२, जॉर्ज बेली ५३; स्टुअर्ट ब्रॉड २/६३)