इंग्लंडचा पहिला डाव ६७ धावांत गडगडला; हॅझलवूडचे पाच बळी

जोश हॅझलवूडच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ६७ धावांत कोसळला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने मार्नस लॅबूशेनच्या अर्धशतकी खेळीमुळे दुसऱ्या डावात ५६ षटकांत ६ बाद १७० धावा करताना एकूण आघाडी २८२ धावांपर्यंत नेली आहे.

जोफ्रा आर्चरच्या (६/४५) भेदक माऱ्याच्या बळावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १७९ धावांत रोखले. परंतु इंग्लंडच्या फलंदाजांना याचा फायदा उठवता आला नाही. कर्णधार जो रूट सलग दुसऱ्यांदा भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. त्यामुळे उपाहारानंतर काही मिनिटांतच इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला. जो डेन्लेने सर्वाधिक १२ धावा केल्या. इंग्लंडच्या बाकी फलंदाजांना धावांचे दशकसुद्धा गाठता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून हॅझलवूडने ३० धावांत ५ बळी घेण्याची किमया साधली, तर पॅट कमिन्स (३/२३) आणि जेम्स पॅटिन्सन (२/९) यांनी त्याला अप्रतिम साथ दिली.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवातही निराशाजनक झाली. डेव्हिड वॉर्नर खातेही न खोलता स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. सलामीवीर मार्कस हॅरिस (१९), उस्मान ख्वाजा (२३) हे माघारी परतल्यानंतर मार्नस लॅबूशेन आणि ट्रेव्हिस हेड यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी ४५ धावांची भर घातली. लॅबूशेनने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावत ऑस्ट्रेलियाला खडतर स्थितीतून बाहेर काढले. त्याला हेड (२५) आणि मॅथ्यू वेड (३३) यांनी चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक

  • ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १७९
  • इंग्लंड (पहिला डाव) : २७.५ षटकांत सर्व बाद ६७ (जो डेन्ले १२; जोश हॅझलवूड ५/३०)
  • ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ५६ षटकांत ६ बाद १७० (मार्नस लॅबूशेन खेळत आहे ५२, मॅथ्यू वेड ३३, ट्रेव्हिस हेड २५; बेन स्टोक्स २/३२, स्टुअर्ट ब्रॉड २/३४).