चौथी अ‍ॅशेस कसोटी आजपासून मँचेस्टरला * अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिका

मँचेस्टर : जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेला ऑस्ट्रेलियाचा नामांकित फलंदाज स्टीव्ह स्मिथ दुखापतीतून सावरला असून पुनरागमनासाठी सज्ज आहे. त्यामुळे बुधवारपासून मँचेस्टरला सुरू होणाऱ्या चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची बाजू बळकट झाली असून ते इंग्लंडला कडवी झुंज देतील, अशी अपेक्षा आहे.

बेन स्टोक्सच्या अविश्वसनीय खेळीमुळे इंग्लंडने तिसरी कसोटी अवघा एक गडी शिल्लक राखून जिंकली आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधल्यामुळे या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. विशेषत: स्मिथ विरुद्ध जोफ्रा आर्चर यांच्यातील द्वंद्व पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. दुसऱ्या कसोटीत आर्चरनेच टाकलेल्या आखूड टप्प्याचा चेंडू स्मिथच्या मानेवर आदळला होता व त्यामुळे स्मिथला तिसऱ्या कसोटीला मुकावे लागले.

इंग्लंडच्या अंतिम संघात ख्रिस वोक्सच्या जागी क्रेग ओव्हरटर्नचा समावेश करण्यात आला आहे, तर ऑस्ट्रेलियाने १२ जणांच्या संघातून उस्मान ख्वाजा व जेम्स पॅटिन्सन यांना वगळले आहे.

संघ

* ऑस्ट्रेलिया (१२ खेळाडू) : टिम पेन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबूशेन, ट्रेव्हिस हेड,  मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हॅझलवूड, पीटर सिडल, मिचेल स्टार्क, नॅथन लायन.

* इंग्लंड (अंतिम ११ खेळाडू) : जो रूट (कर्णधार), रॉरी बर्न्‍स, जेसन रॉय, जो डेन्ली, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, क्रेग ओव्हरटर्न, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच.

* सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी ईएसपीएन