देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता या स्पर्धेवर अजुनही टांगती तलवार आहे. मात्र भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराच्या मते करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आल्यास…ऑक्टोबर महिन्यात आयपीएल खेळवणं शक्य होईल.

“ऑगस्ट महिन्यात भारतामधील बहुतांश भागात पाऊस पडत असतो आणि बऱ्याच मैदानांच्या खेळपट्ट्या या ओलसर असतात. त्यामुळे यादरम्यान आयपीएलचं आयोजन केल्यास अनेक सामने रद्द होण्याची भीती आहे. मात्र जगभरात ऑक्टोबर महिन्यापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली, तर आपण १०० टक्के आयपीएल स्पर्धा खेळवू शकतो.” आशिष Star Sports वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता.

केंद्र सरकारने परिस्थितीचा सामना करण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र प्रत्येक दिवशी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करानो बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. आतापर्यंत देशभरात १०० पेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अद्याप या रोगावर ठोस लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आलेलं नाही, त्यामुळे सरकारी यंत्रणा परिस्थिती कधी नियंत्रणात आणतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.