अव्वल मानांकित अरुंधती पनतावणे, सायली गोखले, अदिती मुटाटकर आणि तन्वी लाड यांनी बंगळुरू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. अव्वल मानांकित अरुंधतीने एकेरी प्रकारात नशीब आजमवणाऱ्या अश्विनी पोनप्पावर २१-१९, २१-१८ अशी मात केली.
दुसऱ्या लढतीत तृप्ती मुरगुंडेने माघार घेतल्यामुळे अरुंधतीला विजयी घोषित करण्यात आले. तृतीय मानांकित आणि मुंबईकर तन्वी लाडने रुथ मिशा व्हीचा २१-१३, २१-१० असा पराभव केला. दुसऱ्या लढतीत तिने अनिता ओहलानवर २१-१३, २१-१९ असा विजय मिळवला. चौथ्या मानांकित सायली गोखलेने सांचली दासगुप्तावर २१-८, २१-१४ असा तर रेश्मा कार्तिकवर २१-१९, २१-७ असा विजय मिळवला. नेहा पंडितने पूजावर २१-१८, २१-८ अशी मात केली तर दुसऱ्या लढतीत तिने जी.वृषालीवर संघर्षपूर्ण लढतीत २१-१२, १६-२१, २१-११ असा विजय साकारला. अदिती मुटाटकरने शेशाद्री सन्यालचा २१-१२, २१-१२ असा पराभव केला तर दुसऱ्या लढतीत तिने श्रीयंसी परदेशीवर २१-१६, २१-१४ अशी मात केली. युवा रसिका राजेने जुही देवांगणचा २१-१४, २१-७ असा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात पाचव्या मानांकित साईली राणेवर २१-१९, २१-७ असा विजय मिळवला. द्वितीय मानांकित रितुपर्णा दासने एकता कलिआवर २१-७, २१-१८ असा धुव्वा उडवला तर दुसऱ्या लढतीत मुंबईच्या करिश्मा वाडकरला २१-९, २१-८ असे सहज नमवले. पुरुषांमध्ये शुभंकर डेने हीरक ज्योती निआगवर २१-९, २१-१० असा दणदणीत विजय मिळवला तर दुसऱ्या चुरशीच्या लढतीत त्याने चिराग सेनला १९-२१, २१-१३, २१-११ असे नमवले. सौरभ आणि समीर वर्मा बंधुंनीही आपापल्या लढती जिंकत दुसऱ्या फेरीत स्थान आगेकूच केली.